छत्तीसगडमधील चकमकीत एक लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 03:03 PM2019-07-23T15:03:34+5:302019-07-23T15:14:13+5:30
छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (23 जुलै) चकमक झाली आहे. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे
सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (23 जुलै) चकमक झाली आहे. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. नक्षलवाद्याकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यावर एक लाखाचे बक्षीस होते. मडकम हिडमा असं नक्षलवाद्याचं नाव असून परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे.
सुकमाचे पोलीस अधीक्षक शालभ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरजीचे जवान आणि नक्षलवादी यांच्यामध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीत एक लाखाचे बक्षीस असलेल्या मडकम हिडमा या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. घटनास्थळावरून जवानांनी शस्त्रसाठा देखील जप्त केला आहे.
नक्षलविरोधी मोहीमेचे उप-महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी रायपूरपासून जवळपास 500 किलोमीटर अंतरावरील बिरभट्टी गावाजवळील जंगलात डीआरजीचे पथक शोधमोहिमेवर निघालेले होते. त्याच दरम्यान लपलेल्या नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. जवानांनी देखील त्या गोळीबाराला चोख प्रत्तुत्तर दिले. यामध्ये काही जण जंगलात पळून गेले. तर घटनास्थळी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. मडकम हिडमावर एक लाखाचे बक्षीस होते. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
Sukma SP, Shalabh Sinha: In an exchange of fire with our District Reserve Guard (DRG) team near the forest of Birabhatti, we have recovered a naxal's body identified as Madkam Hidma. He carried a reward of Rs 1 lakh. Two country made weapons recovered from the site. #Chhattisgarhpic.twitter.com/3tlQ5WuUa0
— ANI (@ANI) July 23, 2019
छत्तीसगडमधील सुकमा येथील डब्बाकोंटा परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी (9 जुलै) चकमक झाली होती. डब्बाकोंटा परिसरात नक्षलवाद्यांचे काही म्होरके लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे तर इतरही काही नक्षलवादी जखमी झाले होते. छत्तीसगडमधील धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले असून, मृत नक्षलवाद्यांकडून शस्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली होती. यावेळी जवानांनी हा हल्ला धैर्याने परतवून लावत चार नक्षलवाद्यांना ठार केले होते.
नक्षलवाद्यांशी चकमकीत सीआरपीएफचे तिघे शहीद
नक्षलवाद्यांसोबत शुक्रवारी (29 जून) झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन जवान शहीद झाले व एक मुलगी ठार झाली होती. सीआरपीएफची 199 वी बटालियन आणि राज्याचे पोलीस मोटारसायकलवर त्या भागात गस्त घालत असताना केशकुतुल (जिल्हा बिजापूर) खेड्याजवळ नाल्यापाशी सकाळी 11 च्या सुमारास ही चकमक झाली, असे बिजापूरचे पोलीस अधीक्षक दिव्यांग पटेल यांनी सांगितले होते. या चकमकीत दोन मुलीही सापडल्या, त्यात एक मरण पावली, तर दुसरी जखमी झाली होती. मोटारसायकवर ही गस्त घालणारी तुकडी केशकुतुल येथील छावणीपासून भैरामगडकडे निघाली होती. केशकुतुलमधून ही तुकडी जात असताना सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू करताच चकमक सुरू झाली, असे पटेल म्हणाले होते.