हृदयद्रावक! ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; खांद्यावर मृतदेह ठेवून बाप १० किमी चालला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 01:10 PM2022-03-26T13:10:20+5:302022-03-26T13:11:05+5:30
नर्सनं दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा करण्यात आला आरोप. आरोग्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश.
Chhattisgarh News: छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथील शासकीय रुग्णालयात ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर वडील रुग्णवाहिकेसाठी विनवणी करत राहिले, मात्र त्यांना रुग्णवाहिका मिळालीच नाही. जेव्हा त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही तेव्हा वडिलांनी आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर ठेवला आणि १० किमी चालत आपल्या घरी पोहोचले. आपल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयातील नर्सवर मोठा आरोप करण्यात आला आहे. चुकीचे इंजेक्शन दिल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. हे प्रकरण समोर आल्यानंतर निर्माण झालेला वाद पाहता आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्या सूचनेनुसार बीएमओ हटवण्यात आले. तसंच आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले आहे. याबाबत आरोग्यमंत्र्यांनीही ट्वीट केलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लखनपूर ब्लॉक येथील आहे. ईश्वर दास हे येथील अमदला गावचे रहिवासी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या मुलीची प्रकृती बिघडली होती. तिचा तापही उतरत नव्हता. हे पाहून कुटुंबीयांनी मुलीला घेऊन शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लखनपूर आरोग्य केंद्र गाठलं. परंतु या ठिकाणी उपचार सुरू असताना मुलीचा मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, बराच वेळ प्रतीक्षा करूनही त्यांना रुग्णवाहिका मिळाली नाही.
वडिलांनी सांगितली आपबिती
जेव्हा रुग्णवाहिकेबाबत कोणतीही व्यवस्था होऊ शकली नाही तेव्हा वडील ईश्वर दास यांनी मुलीचा मृतदेह खांद्यावर उचलला आणि घराकडे निघाले. सुमारे दहा किलोमीटर चालत त्यांनी आपलं घर गाठवं. माध्यमांनी ईश्वर दास यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण परिस्थिती सांगितली. मुलीचा मृतदेह नेण्यासाठी जेव्हा रुग्णवाहिकेची विचारणा केली तेव्हा रुग्णालय व्यवस्थापनानं टाळाटाळ केल्याचे ते म्हणाले. नर्सने आपल्या मुलीला चुकीचे इंजेक्शन दिले. यानंतर तिच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिचा मृत्यू झाला, असा आरोपही त्यांनी केला.
आरोग्यमंत्र्यांकडून दखल
या प्रकरणाची आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव यांनी दखल घेत ट्वीटही केलं. यात दिसणारी दृश्ये दुर्दैवी आहेत आणि संभाव्य उपचारानंतर या मुलीचा मृत्यू होणे अत्यंत दुःखद आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल आणि जे आपल्या कर्तव्यांचं पालन करण्यात सक्षम नाहीत, त्यांची जबाबदारी अन्य व्यक्तीकडे सोपवली जाईल असंही ते म्हणाले.