अभ्यास केला नाही, शाळेतून पळून गेला, अन् स्वत:च्या अपहरणाचा घटनाक्रम रचला, विद्यार्थ्याचा बनाव पाहून पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 03:22 PM2022-12-10T15:22:03+5:302022-12-10T15:22:14+5:30
मध्य प्रदेश मधील छिंदवाडा येथील एका सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे सोमवारी अपहरण झाल्याचे समोर आले होते. १२ वर्षाचा मुलगा शाळेतून गायब झाल्याचे समोर आले होते.
मध्य प्रदेश मधील छिंदवाडा येथील एका सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे सोमवारी अपहरण झाल्याचे समोर आले होते. १२ वर्षाचा मुलगा शाळेतून गायब झाल्याचे समोर आले होते. शाळेतील शिक्षकांना समजल्यानंतर शोध मोहिम सुरू झाली होती. पोलिसांनी दोन तासातच विद्यार्थ्याला शोधून ताब्यात घेतले होते. अपहरणकर्त्यांनी मला रेल्वेस्थानकावर सोडूम दिल्याची माहिती त्या विद्यार्थ्याने दिली, पण या प्रकरणात एक वेगळाच खुलासा झाला आहे.
पोलिसांच्या तपासात विद्यार्थ्यानेच आपल्या अपहरणाची कहाणी रचल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना छिंदवाडा येथील जुन्नरदेव पोलीस स्टेशन परिसरातील आहे. सोमवार, 5 डिसेंबर रोजी शाळेतून एक विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. नंतर छिंदवाडा रेल्वे स्थानकावर मेमू ट्रेनमध्ये हा विद्यार्थी सापडला. जुन्नरदेव पोलीस ठाण्याचे प्रभारी ब्रिजेश मिश्रा यांनी मुलाची चौकशी सुरू केली.
Trupti Kolte | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते निलंबित
शाळेतील बाथरूममध्ये गेल्याचे मुलाने पोलिसांना आणि नातेवाइकांना सांगितले होते. दरम्यान, दोन तरुण तेथे आले आणि त्यांनी त्याचे तोंड बंद केले. त्या लोकांनी तोंडावर कापड लावले असं मुलाने सांगितले होते. यानंतर आरोपींनी त्याला रेल्वे स्थानकावर नेले. अपहरणकर्ते त्याला बैतूल ट्रेनमध्ये घेऊन जाणार होते असं त्या विद्यार्थ्याने सांगितले, अपहरणकर्ते मुलासह रेल्वे स्टेशनवर पोहोचताच तो अपहरणकर्त्यांपासून बचावला आणि स्टेशनवर उभ्या असलेल्या मेमू ट्रेनमध्ये चढला आणि गर्दीत गेला.
मात्र मुलाने सांगितलेली ही संपूर्ण गोष्ट खोटी निघाली. आता प्रश्न असा आहे की नेमकं काय झालं? सहावीत शिकणारा हा मुलगा स्वतः शाळेतून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. गृहपाठ न केल्यामुळे तो शाळेतून पळून गेला.
शाळा सुटल्यानंतर तो छिंदवाडा येथे जाण्यासाठी मेमू ट्रेनमध्ये चढला. मात्र अचानक ट्रेनमध्येच त्याचे शेजारी दिसले. शेजाऱ्याने मुलाच्या वडिलांना फोन केला. वडिलांनी भावाला बोलावून छिंदवाडा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या मदतीने मुलाला नातेवाइकांकडे नेले.घरच्यांना कळेल या भीतीने मुलाने आपल्या अपहरणाची खोटी कहाणी रचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलानेच खोटी गोष्ट रचल्याची कबुली दिली आहे.