छोटा राजन दिल्लीत सीबीआयच्या कोठडीत
By admin | Published: November 6, 2015 05:59 AM2015-11-06T05:59:42+5:302015-11-06T05:59:42+5:30
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला अखेर आज (शुक्रवार) पहाटे पावणे सहाच्या सुमारास भारतात आणले. त्याला दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयातील कोठडीत ठेवण्यात आले आहे.
Next
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ०६ - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला अखेर आज (शुक्रवार) पहाटे पावणे सहाच्या सुमारास भारतात आणले. त्याला दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयातील कोठडीत ठेवण्यात आले आहे.
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बाली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर राखेचा धुराळा पसरल्याने छोटा राजनला भारतात आणण्याचा एक दिवस पुढे ढकलला होता. काल (गुरुवारी) बाली येथील विमानतळ उड्डाणासाठी खुले झाल्याची घोषणा होताच सीबीआय, दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने छोटा राजनला भारतात आणण्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर छोटा राजनला घेऊन पोलिसांचे संयुक्त पथक एका विशेष विमानाने बाली येथील गुरह राय आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार काल सव्वादहा वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.४५ वाजता) रवाना झाले. आज (शुक्रवारी) पहाटे पावणे सहाच्या सुमारास दिल्लीच्या पालम विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
छोटा राजनच्या विरोधातील सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सुपुर्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याने आता त्याला मुंबईत नव्हे, तर काही दिवस दिल्लीतच ठेवण्यात येणार आहे. दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात त्याला ठेवण्यात आले असून याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
बालीत अटक केल्यानंतर मुंबईतील तुरुंगात ठेवण्याच्या योजनेला छोटा राजनने तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच, भारतासाठी मोस्ट वॉण्टेड असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून जीवाला धोका असल्याची भीतीही त्याने व्यक्त केली होती.
खून, खंडणी आणि अमली पदार्थांच्या तस्करीसह अनेक गुन्हे असलेल्या छोटा राजनने २७ वर्षांपूर्वी भारतातून पळ काढला होता. मुंबई पोलिसांनाही छोटा राजनची चौकशी करायची आहे. तथापि, त्याला सध्यातरी मुंबई पोलिसांच्या हवाली करण्याची शक्यता कमी आहे.
छोटा राजनचा तपास सीबीआयकडे - राज्य सरकार
छोटा राजनला मुंबईत आणण्यासह त्याच्या चौकशीच्या चर्चेला राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे. त्याच्याविरुद्धचे मुंबईसह राज्यातील सर्व गुन्हे सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहेत. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सायंकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेवून हा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक करारानुसार (यूएनसीटीओसी) त्याच्याविरुद्धचा तपास सीबीआयकडे देण्यात आल्याचे राज्याचे अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांनी सांगितले. तसेच, छोटा राजनचा तपास सीबीआय करणार असल्याने त्याला मुंबईत आणले जाईल की नाही? त्याच्यावरील खटले मुंबईत चालतील की दिल्लीत? याबाबत राज्य सरकार काहीच सांगू शकत नाही, याबाबतचा निर्णय सर्वस्वी सीबीआयकडून घेतला जाईल. सीबीआयला तपासासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठी मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांचे विशेष पथक असेल, असेही बक्षी यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्याचे अप्पर मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांच्यासह पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद, सहआयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी या बैठकीला उपस्थित होते.