छोटा राजनला इंडोनेशियात अटक, भारताच्या ताब्यात देण्याची शक्यता
By admin | Published: October 26, 2015 02:27 PM2015-10-26T14:27:07+5:302015-10-26T17:26:34+5:30
मुंबईमधला कुख्यात डॉन व दाऊद इब्राहिमचा कट्टर वैरी छोटा राजन याला इंडोनेशियातील बालीमध्ये अटक करण्यात आल्याचे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बाली (इंडोनेशिया), दि. २६ - मुंबईमधला कुख्यात डॉन व दाऊद इब्राहिमचा कट्टर वैरी छोटा राजन किंवा राजेंद्र सदाशिव निकाळजे याला इंडोनेशियातील बालीमध्ये अटक करण्यात आली आहे. भारताच्या विनंतीवरून इंटरपोलने मदत केल्याचे आणि राजनला ताब्यात घेतल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. राजनवर अनेक खून, खंडणी, जे. डे या पत्रकाराची हत्या अशा अनेक गुन्ह्यांचा आरोप आहे. सिडनीमधून रविवारी बालीला आल्यानंतर ५५ वर्षांच्या एका व्यक्तिला पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे इंटरपोलच्या हवाल्याने सांगण्यात आले. अधिक चौकशीनंतर ही व्यक्ती छोटा राजन असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी ही घटना घडली असून भारताने राजनसाठी इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस बजावली असल्याने त्याला भारतात पाठवण्यात येईल अशी शक्यता आहे.
जवळपास दोन दशके राजन फरार होता. दाऊद इब्राहिमला मुंबईतल्या बाँबस्फोटांसाठी जबाबदार धरलेल्या राजनने संपवण्याचा विडा उचलला होता. एकेकाळच्या या सहका-यांमध्ये वितुष्ट आल्यानंतर दोघेही एकमेकाच्या जीवावर उठले होते आणि दाउदला पकडण्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था राजनचे सहकार्य घेत असल्याचेही सांगण्यात येत होते. मात्र, आता राजनच्या अटकेचे वृत्त आल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
इंडोनेशियाच्या इंटरपोलने आपल्या वेबसाईटवर छोटा राजनला अटक केल्याचे स्पष्ट केले असून त्याचा फोटोही अपलोड केला आहे. गरुडा इंडोनेशियाच्या विमानाने राजन सदाशिव निकाळजे पासपोर्ट क्रमांक G9273860, सिडनीहून बाली बेटावर येत असल्याचे कॅनबेराच्या इंटरपोलनी कळवल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. साधारण १५ दिवसांच्या मुक्कामासाठी तो बाली येथे येणार असल्याचेही कळवण्यात आले होते. १२ ऑक्टोबर १९९४ आणि ९ जुलै १९९५ या दिवशी इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसीद्वारे राजनवर वॉरंट होते आणि भारतात त्याने १५ ते २० जणांची हत्या घडवल्याचा आरोप होता असे सांगत यावेळी इमिग्रेशन ऑफिसमध्ये ओळख पटवून राजनला ताब्यात घेतल्याचे व पुढील कारवाईसाठी पोलीसांकडे सोपवल्याचे इंटरपोल इंडोनेशियाने म्हटले आहे. इंटरपोल इंडोनेशियाने राजनचा फोटोही आपल्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या फोटात छोटा राजन चक्क मजेत असल्याचे व हसत असल्याचे दिसत आहे.
राजन मोहनकुमार या नावाने बोगस पासपोर्टच्या सहाय्याने प्रवास करत होता. मात्र, कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलियाच्या इंटरपोलच्या अधिका-यांना त्याचा संशय आल्यामुळे त्यांनी बालीमधल्या इंडोनेशियाच्या इंटरपोलला या प्रवाशाची सगळी माहिती दिली. त्यामुळे बालीला उतरताच राजनला ताब्यात घेण्यात आले आणि नंतर पोलीसांकडे सोपवण्यात आले.
भारतीय सुरक्षा यंत्रणा इंडोनेशियाच्या पोलीसांशी संपर्कात असून लवकरच त्याच्या प्रत्यार्पणासंदर्भात अधिक माहिती मिळू शकेल.