अंडरवर्ल्डमध्ये फूट; वेगळे झाले दाऊद आणि छोटा शकील, गुप्तचर यंत्रणेच्या सुत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 08:12 AM2017-12-13T08:12:46+5:302017-12-13T12:27:15+5:30
गेल्या कित्येक वर्षापासून सोबत असणाऱ्या अंडरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व छोटा शकील वेगळे झाल्याचं वृत्त आहे.
मुंबई- गेल्या कित्येक वर्षापासून सोबत असणाऱ्या अंडरर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व छोटा शकील वेगळे झाल्याचं वृत्त आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्याच्या सुत्रांकडून ही माहिती मिळते आहे. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार,शकील आणि दाऊदचे रस्ते आता वेगळे झाले आहेत. शकील जवळपास 1980 साली मुंबई सोडल्यानंतर दाऊदकडे कराचीच्या रेडक्लिफ भागात राहत होता. पण आता शकीलने स्वतःचा ठिकाणा बदलला असून तो कुठे आहे ? याबद्दलची माहिती कोणालाही नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
दाऊद आणि शकीलचं वेगळं होण्याचा कारण त्या दोघांमध्ये नुकतीच झालेली भांडण असू शकतं, अशी शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे. शकील हा दाऊदच्या सगळ्यात जवळच्या लोकांपैकी एक असून तो गेल्या तीन दशकांपासून त्याच्यासोबत राहतो आहे. दाऊद व शकील दोघांनी मिळून गँग चालविली होती. शकीलचं वय सध्या जवळपास 50 इतकं असेल. शकील व दाऊद या दोघांमध्ये नुकतंच दाऊदचा लहान भाऊ अनीसचा गँगच्या कारभारातील हस्तक्षेपामुळे वाद झाले होते. त्याच वादामुळे शकील वेगळा झाल्याचं बोललं जातं आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, अनीस पाकिस्तानात दाऊदबरोबरच राहतो. याआधीही त्याने गँगच्या कामात हस्तक्षेप करून दाऊदच्या जवळ जाण्याचे प्रयत्न केले होते. दाऊदने नेहमीच त्याच्या भावांना गँगमध्ये दखल न देण्याचा सल्ला दिला होता. नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये दाऊद व शकीलमध्ये अनीसच्या मुद्द्यावरून वादावादी झाली. या बैठकीत दाऊदने शकीलाल गँगपासून लांब राहण्यास सांगितलं व दुबईमध्ये त्याने काही खास लोकांबरोबर बैठक केली. दुसरीकडे शकीलनेही पूर्व आशियाई देशात त्याच्या खास व्यक्तींबरोबर बैठक केली आहे.
दाऊद आणि छोटा शकील यांच्यात फूट पडल्याची बातमी आल्याने पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणाही सावध झाल्या आहेत. मुंबई, दुबई आणि पाकिस्तान या ठिकाणी डी गँगच्या काही मोजक्या लोकांनाच दाऊद आणि छोटा शकील यांच्यात झालेल्या वादाची माहिती आहे. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दाऊदचा हात होता. तसेच छोटा शकीलही या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. डी गँगपासून छोटा शकीलने फारकत घेतल्यामुळे आता एकाच गँगच्या दोन टोळ्या आणि त्यातील नवा वाद समोर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दाऊद व शकील वेगळे होणं अशक्य आहे. दाऊदचा भाऊ त्याला सोडून वेगळा होऊ शकतो पण शकील असं करणं अशक्य आहे. शकील आयुष्यभर दाऊदशी प्रामाणिक राहणारा आहे. पण जर त्या दोघांमध्ये काही मतभेत झाले असतील तर ते फक्त अनीसमुळे झालेले मतभेद असतील, अशा प्रतिक्रिया येत आहेत.