चिदंबरम यांनी कोर्टाचा अपमान केला आहे - शिवसेना नेते संजय राऊत
By admin | Published: February 25, 2016 02:24 PM2016-02-25T14:24:44+5:302016-02-25T14:25:39+5:30
संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी दिलेला अफझल गुरू कदाचित दोषी नव्हता या विधानावरून माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर टीका सुरू झाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फाशी दिलेला अफझल गुरू कदाचित दोषी नव्हता या विधानावरून माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावर टीका सुरू झाली आहे. चिदंबरम यांनी कोर्टाचा अपमान केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी शिवसेनेने केल्याचे वृत्त एएन आयने दिले आहे.
चिदंबरम कोण लागतात? ते कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत आहेत का? अफझलला फाशी कायद्याप्रमाणं झाली असून सर्वोच्च न्यायालयाची खात्री पटल्यानंतर झाली असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने नेहमीच दहशतवाद्यांना आसरा दिल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
काँग्रेसची सावध भूमिका, चिदंबरम यांच्या विधानावर मौन
ज्येष्ठ काँग्रेस नेते अश्वनी कुमार यांनी कुठल्या संदर्भात चिदंबरम काय बोलले आहेत, हे माहीत नसल्याचे सांगत प्रतिक्रिया दिली नाही. अर्थात, सर्वोच्च न्यायालय हे घटनेप्रमाणे काम करते आणि त्यांनी दिलेला निर्णय अचूक असतो असं सांगत, जर चिदंबरम तसं बोलले असतीलच तर काँग्रेस त्यांच्यापासून चार हात लांबच राहील असेही सूचित केले आहे.
काय म्हणाले होते चिदंबरम?
अफझलच्या खटल्यामध्ये कोर्ट योग्य निष्कर्षाला पोचलं होतं का आणि फाशी ही योग्य शिक्षा होती का असा प्रश्न चिदंबरम यांना विचारण्यात आला होता. यावेळी चिदंबरम म्हणाले की, "मला वाटतं कीअफझल गुरूच्या बाबतीत योग्य निर्णय झाला नाही असं प्रामाणिक मत बनवणं शक्य आहे. पण, सरकारमध्ये असताना असं म्हणता येत नाही, कारण सरकार म्हणून तुम्हीच त्याच्यावर खटला भरलेला असतो. पण एक तटस्थ व्यक्ती या नात्याने या खटल्याचा निकाल योग्य नव्हता असं मत बाळगता येतं."