चिदम्बरम यांनी तिहार तुरुंगात केली लापशीची न्याहारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 07:05 AM2019-09-07T07:05:27+5:302019-09-07T07:05:32+5:30
रात्रभर झोप नाही; धार्मिक ग्रंथाचे वाचन
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील आरोपी व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी तिहार कारागृहामध्ये शुक्रवारी सकाळी धार्मिक ग्रंथाचे वाचन केले, तसेच न्याहारीमध्ये लापशी घेतली. मुलगा कार्ती याने चिदम्बरम यांची कारागृहात भेट घेतली.
चिदम्बरम यांची या कारागृहात गुरुवारी संध्याकाळी रवानगी करण्यात आली. त्या रात्री त्यांना व्यवस्थित झोप लागली नाही. त्यांना सात क्रमांकाच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणांतील आरोपींना शक्यतो याच कोठडीमध्ये ठेवण्यात येते. चिदम्बरम यांनी शुक्रवारी सकाळी सहा वाजता न्याहारीदरम्यान लापसी, चहा घेतला. त्यानंतर वृत्तपत्रे, धार्मिक ग्रंथाचे वाचन केले. कारागृहात त्यांना कोणत्याही विशेष सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.
इतर कैद्यांप्रमाणे चिदम्बरम तिहार तुरुंगातील ग्रंथालयात जाऊन वाचन करू शकतात. तसेच विशिष्ट कालावधीसाठी टीव्ही पाहण्याची मुभा कैद्यांना आहे. चिदम्बरम यांचा मुलगा कार्ती यालाही तिहार कारागृहातील सात क्रमांकाच्या कोठडीमध्ये गेल्या वर्षी बारा दिवस ठेवण्यात आले होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा व अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातील आरोपी रतुल पुरी यांनाही तिहार तुरुंगातच ठेवण्यात आले आहे.
कार्ती यांना १० कोटी देण्यास नकार
च्आयएनएक्स मीडिया घोटाळा व अन्य प्रकरणांतील आरोपी कार्ती चिदम्बरम यांनी विदेशात जाण्याआधी न्यायालयात भरलेली १० कोटी रुपयांची अनामत रक्कम आणखी तीन महिने परत मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले आहे. न्या. दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा आदेश दिला.
च्पी. चिदम्बरम यांच्या विरोधात एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी दिल्ली विशेष न्यायालयाने बेमुदत तहकूब केली आहे. या खटल्याची सुनावणी तहकूब करण्याची सीबीआय व ईडीकडून वारंवार मागणी होत असल्याने न्या. ओ. पी. सैनी यांनी हे पाऊल उचलले आहे.