चिदम्बरम यांची सीबीआय चौकशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:53 AM2018-03-08T01:53:54+5:302018-03-08T01:53:54+5:30
अर्थमंत्री असताना पी. चिदम्बरम यांनी २0१३ साली सोने आयातीची जी ८0-२0 योजना आणली होती, तिला महसूल गुप्तचर संचालनालयाचा (डीआरआय) विरोध होता, असे संसदेच्या लोकलेखा समितीच्या उपसमितीला आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस ही समिती करू शकेल, असे सांगण्यात येत आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली - अर्थमंत्री असताना पी. चिदम्बरम यांनी २0१३ साली सोने आयातीची जी ८0-२0 योजना आणली होती, तिला महसूल गुप्तचर संचालनालयाचा (डीआरआय) विरोध होता, असे संसदेच्या लोकलेखा समितीच्या उपसमितीला आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस ही समिती करू शकेल, असे सांगण्यात येत आहे.
या योजनेमुळे काळा पैसा व मनी लाँड्रिंगला चालना मिळेल, असे डीआरआयने अर्थ मंत्रालयाला सांगितले होते. तरीही पी. चिदम्बरम यांनी ही योजना आणली, अशी माहिती या उपसमितीपुढे
आल्याचे एका सदस्याने सांगितले. भाजपाचे खा. निशिकांत दुबे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. या उपसमितीपुढे डीआरआय, सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) व सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साइज अँड कस्टम्स (सीबीईसी) चे अधिकारीही हजर झाले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी शिफारस करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
शिवाय आयएनएक्स मीडियाच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कार्ती चिदम्बरम अटकेत असतानाच पी. चिदम्बरम यांना संकटांचा सामना करावा लागेल, असे दिसत आहे. ईडी व सीबीआय यांनी जे पुरावे एकत्र केले आहेत, त्याआधारे चिदम्बरम यांना आधी चौकशीला बोलावण्यात येईल आणि कदाचित पुढील कारवाई होईल,अशी शक्यता व्यक्त होत आहे.
आपण आधी चिदम्बरम यांच्या सांगण्यावरून कार्ती यांना भेटलो व त्यांना फीच्या रूपात १0 लाख डॉलर्स दिले, असे इंद्राणी मुखर्जीने दंडाधिकाºयांना दिलेल्या जबाबात म्हटल्याचा दाखला दिला जात आहे. फी दिल्यानंतरच आयएनएक्स मीडियाचे काम झाले, असा आरोप आहे.
कार्ती यांच्या जामिनावर उद्या, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, कार्तीची बाजू मांडण्यासाठी कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी असे अनेक वरिष्ठ कायदेतज्ज्ञ उभे राहणार आहेत. त्यांना जामीन मिळू नये, यासाठी सीबीआय व ईडी प्रयत्नशील आहे. आपल्या मुलाला जाणीवपूर्वक व त्रास देण्यासाठीच अडकवले जात आहे, असा चिदम्बरम यांचा आरोप आहे.
आयएनएक्स मीडियाच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कार्ती चिदम्बरम अटकेत असतानाच माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना संकटांचा सामना करावा लागेल, असे दिसत आहे.
नार्को टेस्टसाठी न्यायालयाकडे अर्ज
आयएनएक्स मीडिया मनी लाँड्रिंगप्रकरणी कार्ती चिदम्बरम यांची नार्को टेस्ट करण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज सीबाआयने विशेष न्यायालयाकडे केला आहे.