चिदम्बरम यांचा दसराही तिहार तुरुंगामध्येच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 04:51 AM2019-10-05T04:51:16+5:302019-10-05T04:52:16+5:30
आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणातील आरोपी व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे १४ आॅक्टोबरपर्यंत मत मागविले आहे.
नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणातील आरोपी व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचे १४ आॅक्टोबरपर्यंत मत मागविले आहे. तशी नोटीस न्यायालयाने सीबीआयला शुक्रवारी जारी केली. त्यामुळे चिदम्बरम यांना दसराही कारागृहातच घालवावा लागेल.
चिदम्बरम यांना सध्या तिहार तुरुंगात ठेवले आहे. त्यांनी जामिनासाठी केलेला अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी फेटाळून लावला होता. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका चिदम्बरम यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून, तिची पुढील सुनावणी १५ आॅक्टोबर रोजी होणार आहे.
चिदम्बरम यांना सीबीआयने २१ आॅगस्ट रोजी अटक केली होती. चिदम्बरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, आपल्या अशिलाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने तीन निकष तपासून पाहिले होते. ते विदेशात पळून जाण्याची, पुरावे नष्ट करण्याची शक्यता नाही, असे न्यायालयाचे मत झाले. मात्र ते साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात, असे वाटल्याने उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ईडीने मनीलाँड्रिंग प्रकरणात त्यांना अद्याप अटक केलेली नाही हेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.