प्रजासत्ताक दिनी अबूधाबीचे प्रिन्स असणार प्रमुख पाहुणे
By Admin | Published: October 3, 2016 06:49 PM2016-10-03T18:49:10+5:302016-10-03T20:43:29+5:30
अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स पुढच्या प्रजासत्ताक दिनी भारताला भेट देणार आहेत.
नवी दिल्ली, दि. 3 - अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स पुढच्या प्रजासत्ताक दिनी भारताला भेट देणार आहेत. जानेवारी 2017मध्ये होणा-या प्रजासत्ताक दिनी प्रिन्स यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संयुक्त अरब अमरातीमधल्या सात देशांमध्ये युएई हा देश सर्वात शक्तिशाली असून, कच्चे तेल आयात करणारा खूप मोठा देश आहे.
आतापर्यंत यूएईनं पाकिस्तानशी जवळिकी साधली होती. मात्र आता पाकिस्तानबाबतचं यूएईचं धोरण बदलल्याचं पाहायला मिळतं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जाएद अल नाहयान यांना प्रजासत्ताक दिनी भारतात येण्यासाठी निमंत्रण दिलं आहे. क्राऊन प्रिन्स यांनीही या निमंत्रणावरून आभार प्रदर्शन व्यक्त केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी यूएईनं पाकिस्तानच्या अनुकूल भूमिका घेतली होती.
दाऊद इब्राहिमलाही यूएईमध्ये आतापर्यंत ऐशोरामात राहत असल्याचं वृत्त अनेकदा समोर आलं होतं. मात्र आता पाकिस्तानबाबतचा यूएईचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळे यूएई भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादावर भारत आणि यूएई या देशांची सारखीच भूमिका आहे. यूएईच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारताला तेल आयात करण्याच्या दृष्टीनं मोठा फायदा होणार आहे.