गरजूंची सेवा करू शकलो याचेच सर्वाधिक समाधान, कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 08:03 AM2024-11-09T08:03:58+5:302024-11-09T08:04:17+5:30
Chief Justice Dhananjay Chandrachud News: जे गरजू आहेत त्यांची आणि ज्यांना आपण ओळखत नाहीत किंवा कधी भेटलो नाहीत अशा लोकांची सेवा करू शकलो यापेक्षा दुसरी कोणतीच मोठी भावना असू शकत नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.
नवी दिल्ली - जे गरजू आहेत त्यांची आणि ज्यांना आपण ओळखत नाहीत किंवा कधी भेटलो नाहीत अशा लोकांची सेवा करू शकलो यापेक्षा दुसरी कोणतीच मोठी भावना असू शकत नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले. या यशस्वी कारकीर्दीत देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने मनात पूर्णत्वाची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्या. चंद्रचूड १० नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. यानिमित्त नियोजित सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या उपस्थितीत न्या. चंद्रचूड यांना निरोप देण्यात आला.
पिता-पुत्रांनी जपले पावित्र्य
■ सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड यांनी वडील माजी सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड यांचा वारसा जपत सर्वसामान्यांना न्याय देताना कायद्याचे पावित्र्य जपले.
■ २९ मार्च २००० रोजी मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून त्यांची सुरू झालेली कारकीर्द ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सर- न्यायाधीश या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचली. पिता-पुत्र देशाचे सरन्यायाधीश होण्याची ही एक ऐतिहासिक नोंद ठरली.
न्यायालयाने सदैव प्रोत्साहित केले न्यायालयानेच मला कायम प्रोत्साहित केले आहे. कारण असा एकही दिवस नाही, ज्यादिवशी असे वाटले की तुम्ही काहीच शिकले नाही किंवा समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली नाही. हे संस्था आणि न्यायाच्या उद्देशाबाबत आहे, जे आपण येथे कायम ठेवतो.
- न्या. धनंजय चंद्रचूड