सरन्यायाधीश उदय लळीत न्यायालयाच्या पायऱ्यांवर झाले नतमस्तक! ७४ दिवसांत १० हजार खटले काढले निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 08:56 AM2022-11-09T08:56:46+5:302022-11-09T08:57:20+5:30
३७ वर्षे सर्वोच्च न्यायालयात काम केल्यानंतर सरन्यायाधीश यू. यू. लळीत कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी भावुक झाले.
नवी दिल्ली
३७ वर्षे सर्वोच्च न्यायालयात काम केल्यानंतर सरन्यायाधीश यू. यू. लळीत कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी भावुक झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या पायऱ्यांवर डोके ठेवून ते नतमस्तक झाले. भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड बुधवारी शपथ घेणार आहेत.
सरन्यायाधीश लळीत ३७ वर्षे सर्वोच्च न्यायालयात होते. पहिली २९ वर्षे वकील म्हणून आणि शेवटची ८ वर्षे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले. मंगळवारी सायंकाळी ते न्यायालयात आले होते.
कामावर समाधानी, आश्वासने जवळपास पूर्ण
मी जेव्हा या पदावर आलो तेव्हा एकच ध्येय होते की घटनापीठाने काम केले पाहिजे. म्हणूनच मी सहा घटनापीठे तयार केली. सर्व न्यायाधीशांना कोणत्या ना कोणत्या पीठात नेमले. खटले लवकर निकाली निघावेत म्हणून मी सर्व न्यायाधीशांशी बोललो आणि कामाची विभागणी केली. मी माझ्या कामावर समाधानी आहे व मी माझी आश्वासने जवळपास पूर्ण केली आहेत, असे लळीत म्हणाले.
लळीत यांचे ४ मोठे निर्णय...
- गुजरात दंगलीची सर्व प्रकरणे बंद
- छावला सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींची निर्दोष मुक्तता
- तिस्ता सेटलवाड, कप्पन सिद्दिकी यांना जामीन
- ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मुद्दा निकाली
७४ दिवसांत १० हजार खटले निकाली
सरन्यायाधीश लळीत यांनी ७४ दिवसांच्या कार्यकाळात एकाहून अधिक घटनापीठ स्थापन करण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या काळात १० हजारांहून अधिक खटले निकाली काढण्यात आले, तर गुणवत्तेअभावी समारे 23 हजार प्रकरणे फेटाळण्यात आली.