महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीशपदी, शपथविधी हाेताच न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे राष्ट्रध्वजाला वंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 06:18 AM2022-11-10T06:18:23+5:302022-11-10T06:18:52+5:30
राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना शपथ दिली. त्यांनी इंग्रजीत देवाच्या नावाने शपथ घेतली.
नवी दिल्ली :
अयोध्या जमीन विवाद प्रकरणासह अनेक ऐतिहासिक निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा भाग असलेले न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी बुधवारी भारताचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी त्यांना शपथ दिली. त्यांनी इंग्रजीत देवाच्या नावाने शपथ घेतली.
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्याकडून सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. न्यायमूर्ती चंद्रचूड वयाच्या ६५ वर्षापर्यंत अर्थात १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत या पदावर असतील. पदग्रहण समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, किरेन रिजिजू व मावळते सरन्यायाधीश लळित उपस्थित होते. ११ ऑक्टोबर रोजी लळित यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली. १७ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची ५०वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली होती.
माझ्यासाठी मोठी संधी आणि जबाबदारीही
सामान्य लोकांची सेवा करणे यालाच माझे प्राधान्य आहे. मी देशातील सर्व नागरिकांसाठी काम करीन, मग ते तंत्रज्ञानातील असो किंवा नोंदणी क्षेत्रातील; मी प्रत्येक बाबतीत नागरिकांची काळजी घेईन. न्यायपालिकेचे नेतृत्व करणे, ही एक मोठी संधी आणि जबाबदारी आहे. मी केवळ शब्दांतून नव्हे तर माझ्या कामातून नागरिकांचा विश्वास संपादन करीन.
- धनंजय यशवंत चंद्रचूड,
सरन्यायाधीश