कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही; न्या. चेलमेश्वर यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:49 AM2018-04-09T01:49:47+5:302018-04-09T01:49:47+5:30
सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही, असे मत ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जे. चेलमेश्वर यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील कार्यपद्धतीवरून निर्माण झालेला पेच सरन्यायाधीशांच्या महाभियोगाने सुटणार नाही, असे मत ज्येष्ठ न्यायाधीश न्या. जे. चेलमेश्वर यांनी व्यक्त केले आहे.
सरन्यायाधीशांविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या चार न्यायाधीशांपैकी एक न्या. तरुण गोगोई यांना सरन्यायाधीश म्हणून डावलले गेले, तर आम्ही चार न्यायाधीशांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरेल, असेही ते म्हणाले. हार्वर्ड क्लब आॅफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातील मुलाखतीत न्या. चेलमेश्वर यांनी अनेक विषयावर भाष्य केले.
या वेळी न्या. चेलमेश्वर म्हणाले की, मला आशा आहे की, न्या. तरुण गोगोई यांना सरन्यायाधीश म्हणून डावलले जाणार नाही, पण असे झाल्यास आम्ही तीन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत जे सांगितले होते, ते खरे ठरेल. १२ जानेवारी रोजी न्या. चेलमेश्वर आणि त्यांचे तीन सहकारी न्या. गोगोई, मदन बी. लोकुर आणि कुरियन जोसेफ यांनी एका पत्रकार परिषदेत न्यायालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थत केले होते. विशेषत: सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडून खटल्यांचे होणारे वाटप याबाबत आक्षेप नोंदविले होते.
न्या. चेलमेश्वर हे जूनमध्ये निवृत्त होणार आहेत. सेवा-ज्येष्ठतेच्या बाबतीत न्या. गोगोई हे सरन्यायाधीश पदासाठी दावेदार समजले जातात.
>जनहिताचे मुद्देही सोडविले जावेत
सरन्यायाधीशांबद्दल विचारले असता, चेलमेश्वर म्हणाले की, ‘मी ज्योतिषी नाही. सरन्यायाधीशांकडे निश्चितच हा अधिकार आहे की, त्यांनी न्यायपीठाची स्थापना करावी, पण घटनात्मक तरतुदीनुसार, सर्व अधिकारांसह काही जबाबदाºयाही जोडल्या गेलेल्या आहेत. अधिकारांचा वापर केला जावा, पण त्यासोबतच जनहिताचे मुद्देही सोडविले जावेत. त्या अधिकाराचा उपयोग केवळ यासाठी करू शकत नाहीत. कारण तो अधिकार आपल्याकडे आहे.’