"NDA सरकार पडणार", PM मोदींच्या शपथविधीपूर्वी ममता बॅनर्जींचे मोठे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 08:18 PM2024-06-08T20:18:01+5:302024-06-08T20:24:13+5:30
देशात एनडीए सरकार स्थापन होत आहे, नरेंद्र मोदी उद्या ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. देशात एनडीए सरकार स्थापन होत आहे, इंडिया आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने देशात पुन्हा १०० जागांवर विजय मिळवला आहे. नरेंद्र मोदी उद्या ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदींच्या शपथविधीपूर्वी टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मोठा दावा केला आहे. "भाजपचे अनेक नेते काही दिवसांत पक्ष सोडू शकतात. भाजपचे अनेक नेते खूप नाराज आणि नाराज आहेत. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला.
मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला तृणमूल काँग्रेस उपस्थित राहणार की नाही या प्रश्नाला उत्तर देताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या की, शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. तृणमूल काँग्रेस शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे टीएमसी प्रमुखांनी सांगितले. आम्हाला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळालेले नाही. देशाला बदलाची गरज आहे, आम्ही राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जनादेश आल्यावर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होऊ नये. आज इंडिया आघाडीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही, याचा अर्थ भविष्यात आम्ही तसे करणार नाही, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
ममता बॅनर्जी यांनी सीएएबाबत भाजपवर निशाणा साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, CAA रद्द करावा लागेल. ही मागणी आम्ही संसदेत मांडणार आहोत. मला माफ करा, पण मी असंवैधानिक, बेकायदेशीर पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी शुभेच्छा देऊ शकत नाही. माझ्या शुभेच्छा देशासाठी असतील, मी सर्व खासदारांना सांगेन की, पक्ष मजबूत करा. तुमचा पक्ष आम्ही तोडणार नाही, पण तुमचा पक्ष आतून फुटेल, तुमच्या पक्षात लोक खूश नाहीत, असंही बॅनर्जी म्हणाल्या.
मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला
येत्या ९ जूनला सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला जगभरातील पाहुण्यांसह ९००० जण उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी पंतप्रधान आणि काही कॅबिनेट मंत्री शपथ घेतील. या सोहळ्यासाठी बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशससह अन्य देशातील नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. मोदी तिसऱ्यांदा शपथ घेण्यापूर्वी त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपाचे हे नेते बनू शकतात मंत्री
मिळालेल्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात भाजपाकडून राजनाथ सिंह, अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, एस जयशंकर, महेश शर्मा, एसपी सिंह बघेल, अनुराग ठाकूर, पीयूष गोयल, मनसुख मंडाविया, नित्यानंद राय, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत, राजीव प्रताप रुडी, शिवराज सिंह चौहान यांची नावे आघाडीवर आहेत. त्याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे, वीरेंद्र कुमार खटीक, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, सुरेश गोपी, विप्लब देब, सर्वानंद सोनेवाल, प्रल्हाद जोशी, शोभा करंदजले, पीसी मोहन, नारायण राणे, श्रीपाद नाईक यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.