पंजाब सरकारने १२,५०० शिक्षकांना केले पर्मनंट; महिला शिक्षिकेला भेटताच मुख्यमंत्री भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 05:09 PM2023-07-28T17:09:32+5:302023-07-28T17:10:01+5:30
punjab teacher permanent : पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेत राज्यातील १२,५०० शिक्षकांना पर्मनंट केले आहे.
bhagwant mann : पंजाब सरकारने एक मोठा निर्णय घेत राज्यातील १२,५०० शिक्षकांना पर्मनंट केले आहे. यावेळी शिक्षकांचे मनोगत ऐकून मुख्यमंत्रीभगवंत मान भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, मी देखील एका शिक्षकाचा मुलगा आहे, त्यामुळे मला त्यांचे दुःख समजते. तसेच यावेळी मान यांनी मागील सरकारवर टीकास्त्र देखील सोडले. या बैठकीला अनेक शिक्षकही उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
आपल्या भाषणात मुख्यमंत्री मान यांनी शिक्षकांच्या यातना सांगितल्या. "मागील सरकारने या शिक्षकांची थट्टा उडवली होती. कमी पगारात त्यांना काम करावे लागत होते. या शिक्षकांना प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या देखील खाव्या लागल्या. अधिकाऱ्यांनी शिक्षकांचा हा प्रश्न मार्गी लावण्यात अनेक कायदेशीर अडथळे आणले. परंतु, मी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा. सरकारकडे भरपूर पैसा आहे पण हेतू स्पष्ट असणे गरजेचे आहे", असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यादरम्यान, भगवंत मान यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला असून आता पंजाबमधील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना बसेस उपलब्ध होणार आहेत. यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करणार असल्याचे मान यांनी सांगितले. यासाठी २१ कोटी रूपये खर्च येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री मान झाले भावुक
शिक्षकांना पर्मनंट केल्यानंतर प्रमाणपत्र देताना मुख्यमंत्री भगवंत मान भावुक झाले. एका शिक्षिकेने तिची कहाणी सांगितली अन् मान यांना अश्रू अनावर झाले. खरं तर या शिक्षिकेची १४ महिन्यांची मुलगी रुथ हिचा जानेवारी २०१४ मध्ये शिक्षकांच्या आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता. मनोगत व्यक्त करण्यासाठी महिला शिक्षिका रडतच मंचावर आली, जे पाहून मुख्यमंत्री मान भावुक झाले. जानेवारी २०१४ मध्ये या सर्व शिक्षकांनी पर्मनंटच्या मागणीसाठी भटिंडा येथे आंदोलन केले होते, त्यावेळी या चिमुकलीचा थंडीमुळे मृत्यू झाला होता.