संजय राऊतांची दखल काय घ्यायची; दूसरं कोणी असतं तर घेतली असती, एकनाथ शिंदेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 06:23 PM2022-07-19T18:23:59+5:302022-07-19T18:28:23+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
नवी दिल्ली- शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. अनेकांनी फुटून गट निर्माण केला असेल, त्यांना कोणताही अधिकार राहिला नाही. या सर्वाचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. जर लोकसभेमध्ये वेगळा गट तयार करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला होता. तसेच ईडी आणि केंद्रीय यंत्रणांच्या दबावापोटी खासदार फुटले आहेत असा दावा देखील संजय राऊतांनी केला होता.
संजय राऊतांच्या या विधानावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, संजय राऊतांच्या आरोपांची दखल काय घ्यायची, असा टोला लगावला आहे. दूसरं कोणी असतं तर आम्ही दखल घेतली असती. संजय राऊतांच्या आरोपावर आम्हाला बोलण्याची गरज नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच संजय राऊतांचा मॅटिनी शो बंद झाला, असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला.
राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता दिल्लीतही पक्षाला मोठा हादरा बसला आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांनी वेगळी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
जी आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेतली. तिच भूमिका दिल्लीत हे खासदार घेत आहेत. याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. जनतेच्या मनातलं सरकार आम्ही राज्यात स्थापन केलं आहे आणि याचं स्वागत या १२ खासदारांनीही केलं आहे. उद्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील केस कोर्टात आहे. त्या कामासाठी मी इथं आलो होतो. त्यासोबतच या खासदारांचं स्वागतही करण्यासाठी इथं आलो आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचे तुकडे करा, पण शिवसेनेच्या चिन्हावर किंवा शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आलेले आमदार आणि खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. तसेच शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहिल. आज ज्यांच्या घराबाहेर चौकी पहारे लागले आहेत. त्यांना पुन्हा कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करु, हे मात्र मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला होता.