मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, मिटकरींचं भलतंच ट्विट; राज्याच्या राजकारणात चर्चा तर होणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 12:55 PM2023-07-22T12:55:44+5:302023-07-22T13:11:41+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले असून शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ते मुंबईहून दिल्लीला रवाना झाले

Chief Minister Eknath Shinde in Delhi, Amol Mitkari's tweet; There will be discussions in state politics | मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, मिटकरींचं भलतंच ट्विट; राज्याच्या राजकारणात चर्चा तर होणारच

मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, मिटकरींचं भलतंच ट्विट; राज्याच्या राजकारणात चर्चा तर होणारच

googlenewsNext

मुंबई - राज्यातील राजकारणात अजित पवारांच्या रुपाने पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. अजित पवार गटाने भाजपासोबत सत्तेत सहभागी होत राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे, शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बाधून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांना अद्यापही प्रतिक्षाच करावी लागत आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवार यांचे खास म्हणून ओळखले जाणारे अमोल मिटकरी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लवकरच अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे भाकीत केलंय. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिल्लीत पोहोचल्याने पुन्हा राजकीय भूकंप घडतो की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले असून शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ते मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही. मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीत असून ते दिवसभरात राजधानीतच राहणार असल्याचे समजते. ते वैयक्तिक कामासाठी दिल्लीला गेले असल्याचं सांगितलं जात असलं तरी इथे येऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे, या दौऱ्यामागे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे, पण मुख्यमंत्री शिंदे यांनी कालच त्यांना एडव्हान्स शुभेच्छा दिल्या आहेत. 

अमोल मिटकरींचं ट्विट

आज अजित पवार यांचा वाढदिवस असताना त्यांचे खंदे समर्थक असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रामध्ये लवकरच अजित पर्व सुरू होईल, असं ट्विट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असून, पक्षाचे अनेक विद्यमान आमदार त्यांच्यासोबत गेले आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्याकडे वित्तमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र पुढच्या काळात एकनाथ शिंदे यांना हटवून अजित पवार यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद दिलं जाईल, असा दावा संजय राऊतांसह महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मिटकरी यांनी केलेलं ट्विट हे त्याचेच संकेत तर नाहीत ना, असा अंदाज वर्तवला आहे. 

शिंदे गटात नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसचाअजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने आपले मंत्रिपद हुकल्याची भावना शिंदे गटातील आमदारांची झाली आहे. मात्र, याप्रकरणी सहनही होईना आणि सांगताही येईना, अशी अवस्था या मंत्र्यांची आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार सरकारमध्ये सहभागी झाले. यात शिंदेसह दहा जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली. बंड करताना यातील अनेक आमदारांना शिंदे यांच्याकडून तसेच भाजपकडून मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. ते पूर्ण न झाल्याने त्यांच्यातील नाराजी डोके वर काढत आहे. 
 

Web Title: Chief Minister Eknath Shinde in Delhi, Amol Mitkari's tweet; There will be discussions in state politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.