मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेना खासदार संजय जाधवांना फोन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 01:21 PM2022-07-19T13:21:21+5:302022-07-19T13:22:06+5:30
माझं भवितव्य काय होतं? एका शेतकऱ्याचा मुलगा हा माझा भूतकाळ आहे. माझ्या आयुष्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मतदारसंघातील जनता दोघांना महत्त्वाचं स्थान आहे असं संजय जाधव यांनी सांगितले.
नवी दिल्ली - शिवसेना आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी होतील असं बोललं जात आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊनही त्यांना स्पष्ट शब्दात नकार देणारे खासदार संजय जाधव यांनी पक्षाने मला भरभरून दिले आहे. त्यामुळे मी मूळ शिवसेनेतच आहे असं म्हटलं आहे.
खासदार संजय जाधव म्हणाले की, मी शिवसेनेत कार्यकर्त्यापासून नेता झालोय, अपेक्षेपेक्षा खूप जास्त पक्षाने दिले. एवढं पक्षाने दिल्यानंतर पक्षाची प्रतारणा करणं हे माझ्या विचारात बसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र विधानसभेत आलो होतो. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आनंद आहे. तुटेपर्यंत ताणू नये. एका वटवृक्षाखाली वाढलो त्यावर घाव घालताना वेदना होतात. एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी समेट घडवून आणावा. सामान्य शिवसैनिकाचं यात नुकसान होत आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मी पंढरपूरमध्ये असताना मला त्यांचा फोन आला. मी महापूजेला गेलो होते. तिथे बोलण्याचा योग आला नाही. मुख्यमंत्री म्हणून मंदिरात मी त्यांचा सन्मान केला. सोबत या असं ते म्हणाले. पण मी मूळ शिवसेनेतच आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याचा मी मुलगा त्याला शिवसेनेने भरभरून दिले. माझ्या जिल्ह्यातील सामान्य शिवसैनिकाची भावना मूळ शिवसेनेत राहिलं पाहिजे. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहे. मी स्पष्टपणे शिंदे गटास जाण्यास नकार दिला. मी येतो म्हणायचं आणि नकार द्यायचं असं खोटं कुणी बोलू नये असं सांगत खासदार संजय जाधव यांनी त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, माझं भवितव्य काय होतं? एका शेतकऱ्याचा मुलगा हा माझा भूतकाळ आहे. माझ्या आयुष्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि मतदारसंघातील जनता दोघांना महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे मी कधीही त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही. राजकारणात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. जेव्हा मविआ झाली त्यातून आम्हाला जशी वागणूक मिळाली तशी ती मिळाली नाही. त्याची खंत मी बोलून दाखवली. सत्ता असून काय उपयोग असा सवाल कार्यकर्ते करायचे. संघर्ष जिथे उभा राहील तिथे करू पण त्यासाठी पक्ष सोडणं पर्याय नाही असंही संजय जाधव यांनी सांगितले.
पैसा आयुष्यात सगळं काही नाही
५०-६० कोटी जी काही ऑफर आहे मला माहिती नाही. माझ्याशी कुणी संपर्क केला नाही. पुढचा विचार कुणी कुणाचा केला नाही. माणसानं समाधान मानलं तर त्याच्या एवढा आयुष्यात सुखी कुणी नाही. पैशासाठी सगळं काही नाही. पैसा गरजेचा पण सर्वकाही नाही. शेवटी गाठोडं भरून कुणीच घेऊन जाणार नाही त्यामुळे पैशासाठी पक्ष सोडणं मला पटत नाही असंही संजय जाधवांनी स्पष्ट केले.