मुख्यमंत्र्यांची ‘गुप्त’ दिल्लीवारी, मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 07:08 AM2022-07-29T07:08:51+5:302022-07-29T07:09:52+5:30

गेल्या ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

Chief Minister Eknath Shinde's 'secret' visit to Delhi, discussion of ministry expansion? | मुख्यमंत्र्यांची ‘गुप्त’ दिल्लीवारी, मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा?

मुख्यमंत्र्यांची ‘गुप्त’ दिल्लीवारी, मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा?

googlenewsNext

सुरेश भुसारी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री सर्वांना हुलकावणी देत दिल्लीत दाखल झाले आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून गुरुवारी पहाटे मुंबईला परत गेल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची व देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी पाचवेळा दिल्लीवारी केली आहे; परंतु मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटलेला नाही. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल होणार, अशी बातमी दिल्लीत धडकली. काही तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले; परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचे बुधवारी रात्री आगमन झाले. विमानतळावर मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय कुणीही नव्हते.  त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळात किती सदस्य असावे, तसेच मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करायचा, यावरच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. माध्यमांना हुलकावणी देण्यासाठी दौरा रद्द झाल्याची बातमी पेरण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे गुरुवारी दुपारी दिल्लीत आगमन झाले. त्यांनी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली.

दोन-तीन दिवसांत विस्तार - गिरीश महाजन
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन-तीन दिवसांतच होईल, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ते सध्या दिल्लीत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण नसल्याचा दावाही त्यांनी केला.

Web Title: Chief Minister Eknath Shinde's 'secret' visit to Delhi, discussion of ministry expansion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.