सुबोधकुमार यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांनी केले सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:39 AM2018-12-07T06:39:04+5:302018-12-07T06:39:13+5:30
बुलंदशहर जिल्ह्यामध्ये उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेले पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
लखनौ : गोहत्या झाल्याच्या कारणावरून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यामध्ये उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेले पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंह यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ही हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
सुबोधकुमार सिंह यांच्या कालिदास मार्गावरील निवासस्थानी जाऊन त्यांची पत्नी व मुलांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. इटा येथील एका रस्त्याला सुबोधकुमार सिंह यांचे नाव देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. पोलीस निरीक्षकाच्या पत्नीस ४० लाख रुपये, त्यांच्या पालकांना १० लाख रुपये भरपाई देण्याची व त्या कुटुंबातील एका सदस्यास सरकारी सेवेत सामावून घेण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी याआधीच केली आहे. (वृत्तसंस्था)