आनंदीबेन सोडणार गुजरातचे मुख्यमंत्रीपद

By admin | Published: August 2, 2016 06:07 AM2016-08-02T06:07:41+5:302016-08-02T06:07:41+5:30

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी बसविलेल्या आनंदीबेन पटेल यांनी त्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना केली आहे.

Chief Minister of Gujarat will leave Anandben | आनंदीबेन सोडणार गुजरातचे मुख्यमंत्रीपद

आनंदीबेन सोडणार गुजरातचे मुख्यमंत्रीपद

Next


अहमदाबाद/ नवी दिल्ली : दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर खास मर्जीतील म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी बसविलेल्या आनंदीबेन पटेल यांनी त्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना केली आहे. गुजरातमध्ये नेतृत्त्वबदल होणार असल्याची कुणकुण राजकीय निरीक्षकांना काही महिन्यांपूर्वीच लागली होती. परंतु आता आनंदीबेन यांनीच पायउतार होण्याचे जाहीर केल्याने काही दिवसांतच गुजरातमध्ये नवा मुख्यमंत्री निवडला जाणे नक्की आहे.
पुन्हा दोन पटेल स्पर्धेत
आनंदीबेन यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल व सौरभ पटेल हे राज्य मंंत्रिमंडळातील दोन प्रभावशाली मंत्री स्पर्धेत असल्याचे पक्ष सूत्रांकडून समजते. हे दोघेही मोदींच्या काळापासून मंत्री आहेत व ते त्यांचे विश्वासू आहेत. सर्वात उच्चशिक्षित अशी ओळख असलेले सौरभ पटेल सध्या वित्त, उर्जा, पेट्रोलियम, खाणकाम अशी महत्वाची खाती सांभाळत आहेत. नितीन पटेल हेही आरोग्य, वैद्यकीय शिक्षण यासह चार-पाच खात्यांचे मंत्री आहेत.
आपल्याला मुख्यमंत्रीपदातून मुक्त करावे, अशी पक्षश्रेष्ठींना विनंती करणारे पत्र आनंदीबेन यांनी सोमवारी दुपारी त्यांच्या फेसबूक पेजवर टाकले. हे पत्र मिळाले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत त्यावर विचार केला जाईल, एवढेच भाजपातर्फे सांगण्यात आले. आनंदीबेन यांनी या पत्राचा बहुतांश भाग गेली ३० वर्षे आपण पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती म्हणून कसे काम केले हे सांगण्यात व पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर विश्वास टाकून गुजरातची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानण्यात खर्ची घातला. शेवटून दुसऱ्या परिच्छेदात त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून आपल्याला का मुक्त केले जावे याची कारणे दिली आहेत. त्या म्हणतात, भाजपा हा एक शिस्तबद्ध पक्ष आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्यांनी पक्ष वा सरकारमध्ये न राहता तरुणांना संधी देण्याची प्रथा पक्षात रुढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये मला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वीच मी पक्षश्रेष्ठींना जबाबदीरीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. पुढील वर्षाच्या अखेरीस गुजरात विधानसभेची निवडणूक व्हायची आहे. राज्य सरकारचा ‘व्हायब्रंट गुजरात’ हा कार्यक्रमही पुढील वर्षी आहे. या दोन्हींच्या तयारीसाठी नव्या नेत्याला पुरेसा वेळ मिळावा यासाठी मला लवकर मोकळे करावे.
राजकीय निरीक्षकांच्या मते आनंदीबेन स्वत:हून पद सोडत असल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात येत आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोदींच्या सलग १२ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीनंतर पदावर आल्यामुळे आनंदीबेन यांच्या कामगिरीची तुलना मोदींशी केली जाऊ लागली. त्यात त्या फिक्या पडल्या. तरीही मोदींनी घालून दिलेल्या ‘गुजरात मॉडेल’च्या पुण्याईवर त्यांनी दोन वर्षे काढली. परंतु २४ वर्षांच्या हार्दिक पटेलने पाटीदार आंदोलनाच्या रुपाने उभ्या केलेल्या आव्हानाने भाजपाच्या गुजरातमधील अभेद्य गडालाही तडे जाऊ शकतात, हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या यशातून दिसले. उनामधील दलित अत्याचारांवरून देशभर उठलेले रान हे ताजे निमित्त आहे. अशा स्थितीत पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांची मूळ कर्मभूमी असलेल्या गुजरातमधील परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच नवे नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>१५ वर्षांनी पुनरावृत्ती
आनंदीबेन यांच्या जागी भाजपाने नवा मुख्यमंत्री निवडणे ही १५ वर्षांपूर्वीच्या घटनाक्रमाची पुनरावृत्ती आहे. २००१ मध्ये त्यावेळचे ‘हेवीवेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून तोपर्यंत फारसे माहीत नसलेले गुजरात भाजपाचे तत्कालीन सचिव नरेंद्र मोदी यांना त्या खुर्चीवर बसविले गेले होते.
त्यावेळी भूजच्या विनाशकारी भूकंपामुळे उद््भवलेली परिस्थिती नीट न हाताळल्याबद्दल केशुभाई सरकारबद्दल असंतोष होता. त्यातच सांबरकाठा (लोकसभा) व साबरमती (विधानसभा) पोटनिवडणुकांमध्ये दारुण पराभवाचा जबर धक्का भाजपाला सोसावा लागला होता. त्याही वेळी लगेच पुढच्या वर्षी विधानसभेची निवडणूक व्हायची होती.

Web Title: Chief Minister of Gujarat will leave Anandben

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.