नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:50 AM2021-03-11T05:50:25+5:302021-03-11T05:50:33+5:30
पायाला जखम; काेलकात्याला हलविले
नंदीग्राम : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आपल्या कारबाहेर कार्यकर्त्यांशी बोलून कारमध्ये शिरण्याच्या बेतात असताना काही समाजकंटकांनी कारचा दरवाजा त्यांच्या दिशेने ढकलल्याने पायाला जखम झाली.
नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्या एका मंदिरात गेल्या होत्या. तेथून बाहेर आल्यावर त्या कारपाशी उभ्या राहून कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या कारमध्ये शिरत असताना दरवाजा आतील बाजूस ढकलण्यात आला, त्यामुळे त्यांच्या पायाला जखम झाली. त्यांच्या पायाला सूज आली असून, अंगातही कणकण आहे. या प्रकारानंतर त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले.
भाजपवर संशय
तुम्ही आम्हाला परक्या आहात, अशी पोस्टर्स नंदीग्राममध्ये भाजपने लावली आहेत. त्यामुळे तेथील तृणमूलचे कार्यकर्ते संतापले आहेत. अशातच हा प्रकार घडल्याने यामागे भाजपचे लोक असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.