मुख्यमंत्री नितीश कुमार 'आरएसएस'समोर हतबल; तेजस्वी यादवांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 01:00 PM2020-02-13T13:00:54+5:302020-02-13T13:02:17+5:30
नितीश कुमार एकमेव असे नेते आहेत ज्यांच्याकडे तत्व, निती आणि विचारधारा नाही. मात्र उद्देश आहे. ते आता थकले असून लक्ष्यहीन आणि अदुरदर्शी झाले आहेत. 60 टक्के युवक असलेल्या बिहार राज्यात विकास करण्यासंदर्भात काहीही योजना नसल्याचे खंत तेजस्वी यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. नितीश कुमार राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर हतबल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेजस्वी यांनी सोशल मीडियावरून नितीश कुमार यांच्यावर निशाना साधला.
तेजस्वी यादव यांनी म्हटले की, नितीश कुमार यांनी राष्ट्रीय स्वसंसेवक संघ आणि भाजपसमोर पूर्णपणे आत्मसमर्पण केले आहे. नागरिकता संशोधन कायदा, एनपीआर आणि एनआरसीवरून देखील नितीश कुमार यांनी मौन धारण केल्याचा दावा तेजस्वी यांनी केला आहे.
नितीश कुमार एकमेव असे नेते आहेत ज्यांच्याकडे तत्व, निती आणि विचारधारा नाही. मात्र उद्देश आहे. ते आता थकले असून लक्ष्यहीन आणि अदुरदर्शी झाले आहेत. 60 टक्के युवक असलेल्या बिहार राज्यात विकास करण्यासंदर्भात काहीही योजना नसल्याचे खंत तेजस्वी यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, कधीपर्यंत बिहारची ओळख एक अविकसीत आणि मागास राज्य म्हणून राहणार ? आता केंद्रात आणि राज्यात एकाच एनडीएचे सरकार आहे. 15 वर्षे सत्तेत राहुनही बिहार पुढं कसं जाणार याविषयी हे काहीच का बोलत नाही, असा सवालही तेजस्वी यांनी उपस्थित केला आहे.