बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार; तारीखही ठरली, आमदारांना निर्देश, हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 07:55 AM2022-08-08T07:55:43+5:302022-08-08T08:19:29+5:30

जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

Chief Minister Nitish Kumar may once again change his political role after five years. | बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार; तारीखही ठरली, आमदारांना निर्देश, हालचालींना वेग

बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार; तारीखही ठरली, आमदारांना निर्देश, हालचालींना वेग

googlenewsNext

- शरद गुप्ता

नवी दिल्ली: बिहारमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. जदयूचे माजी अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने हा एक संकेत समजला जात आहे.मुख्यमंत्री नितीशकुमार पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय भूमिका बदलू शकतात. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार व राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यात नव्या सरकारच्या गठनाबाबत चर्चाही झालेली आहे.

मुख्यमंत्री लवकरच राज्यपालांना पत्र पाठवून भाजपशी असलेले संबंध संपुष्टात आणतील. त्यानंतर राज्यात राजदच्या सहकाऱ्याने सरकारचे स्थापन करण्यात येईल. या सर्व घडामोडी कधीपर्यंत होतील, असे विचारले असता जदयूच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, बिहारमधील श्रावण संपण्यापूर्वी म्हणजे ११ ऑगस्टपूर्वी हे होऊ शकेल. राज्यात भाद्रपद महिन्यात शुभ कार्य केले जात नाहीत. जदयू व राजदच्या सर्व आमदारांना सोमवारपर्यंत पाटण्यात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

मागील काही दिवसांत राजद नेते तेजस्वी यादव व त्यांची बहीण मिसा यांच्या १७ ठिकाणांवर रेल्वे भरती घोटाळ्याबाबत सीबीआयने छापे टाकले होते. राजदचे म्हणणे आहे की, आता यानंतर केंद्र सरकारकडे राजद नेत्यांच्या विरोधात कोणतेही नवीन प्रकरण उरलेले नाही. त्यामुळे आता ईडी, सीबीआय किंवा आयकर खात्याची कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नाही.

असे आहे समीकरण

मागील विधानसभा निवडणुकीत २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत भाजपने ७४, राजदने ७५ व जदयूने ४३ जागा जिंकल्या होत्या. एक पोटनिवडणूक जिंकल्याने व एआयएमआयएमचे ४ आमदार बरोबर आल्यानंतर राजदच्या सदस्यांची संख्या ८० झाली. त्याचप्रमाणे विकासशील इन्सान पार्टीच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पक्षाच्या सदस्यांची संख्या ७७ झाली. जदयूचेही आता ४५ सदस्य आहेत. डाव्यांचे १६ आमदार आहेत.

जदयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही

जदयूचा कोणीही सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, अशी माहिती जदयू नेते व बिहारचे शिक्षणमंत्री विजयकुमार चौधरी यांनी दिली. याबाबत नितीशकुमार यांनी यापूर्वीच घोषणा केली आहे. आरसीपी सिंह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जदयूकडून कोण सहभागी होणार, याची चर्चा सुरू झाली होती; परंतु शिक्षणमंत्री म्हणाले की, भाजपशी संबंध बिघडल्याचा मुद्दा नाही. २०२४ च्या लोकसभा व २०२५ मधील विधानसभा निवडणुका भाजपबरोबर मिळून लढणार का, असे विचारले असता, ते म्हणाले की, आता आम्ही बरोबर आहोत. 

जदयू, राजदने आमदारांना पाटण्यात बोलावले
जदयू व राजदने आपापल्या आमदारांना तत्काळ पाटण्यात बोलावले आहे. यावरून राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची चर्चा सुरू झाली आहे. हम पक्षानेही आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार व तेजस्वी यादव यांनी फोनवर चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

तेजस्वी घेणार निर्णय
स्वत:बाबत सुरू असलेल्या प्रकरणांच्या  पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनाच निर्णय घ्यायचा आहे की, सरकारमध्ये सहभागी व्हायचे आहे की नाही. जदयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीशकुमार हे लालूंचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांना मंत्रिमंडळात सहभागी करू इच्छित नाहीत.

नाराजीचे हे आहे कारण
विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांच्या राष्ट्रीय लोकशक्ती पार्टीने भाजप नव्हे, तर केवळ जदयू उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढली होती. यामुळे जदयूची ताकद मागील निवडणुकीच्या ७१वरून ४३ आमदारांवर आली. त्याचबरोबर भाजपची ताकद ५३ वरून ७४ झाली. चिराग यांनी भाजपच्या सांगण्यावरून हे काम केले, असे नितीशकुमार मानतात. त्यामुळे आता ते भाजपला धडा शिकवू इच्छित आहेत.

बिहार मध्यावधी निवडणुकीकडे?

बिहारमधील सत्तारूढ जदयूमध्ये अंतर्गत धुमशान वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मध्यावधी निवडणुकीकडे जात आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांनी जदयूला रामराम केल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर प्रखर टीका केली आहे. नितीशकुमार हे सातजन्मात पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. जदयू म्हणजे बुडणारे जहाज आहे, असेही ते म्हणाले. आरसीपी सिंह यांनी पक्ष सोडल्यानंतर पक्षात बंडखोरीचा बिगुल वाजू शकतो. 

Web Title: Chief Minister Nitish Kumar may once again change his political role after five years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.