मुख्यमंत्री म्हणतात, भाजपा-शिवसेना युती अबाधित
By admin | Published: October 16, 2015 04:17 AM2015-10-16T04:17:50+5:302015-10-16T04:17:50+5:30
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती अबाधित असून दोन्ही पक्ष एकोप्याने काम करीत आहेत, असा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिला.
हरिश गुप्ता, नवी दिल्ली
महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती अबाधित असून दोन्ही पक्ष एकोप्याने काम करीत आहेत, असा स्पष्ट निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिला.
भाजप-शिवसेनेदरम्यान सौहार्द्याचे संबंध असून शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखावर मी प्रतिक्रिया देणार नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी काही म्हटल्यावरच मी प्रतिक्रिया देईन, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
शिवसेना युतीतून बाहेर पडेल किंवा भाजपच शिवसेनेशी फारकत घेईल, अशा तर्कविर्तकांना उधाण आणणाऱ्या प्रसार माध्यमातील वृत्ताबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच स्पष्ट प्रतिक्रिया दिली. युतीत काही समस्या जरुर आहेत; परंतु, आम्ही एकत्र आहोत. अन्य भागात स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढविणार असलो तरी मुंबई, पुणे आणि अन्य महापालिकेची निवडणूक मात्र एकत्रच लढविणार आहोत. खाते वाटपावरून दोन्ही पक्षांत मतभेद नसून, बिहारमधील निवडणुकीनंतर राज्यमंत्रिमंडळात फेरबदल केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
>युती संपुष्टात आणण्यास रा.स्व.संघाचा विरोध असल्याने महाराष्ट्रात भाजप-सेना युती अबाधित राहील, असे वृत्त ‘लोकमत’ ने दोन दिवसांपूर्वीच दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपरोक्तपणे स्पष्टोक्ती देत या वृत्ताला दुजोराच दिला आहे.