त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचे महाभारतानंतर माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 10:08 AM2018-04-27T10:08:34+5:302018-04-27T10:08:34+5:30
त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लब देव त्यांच्या कामकाजापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. देव यांनी महाभारत काळातील इंटरनेटवरून केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेली चर्चा थांबत नाही तोच त्यांनी माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
आगरतळा - त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले बिप्लब देव त्यांच्या कामकाजापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. देव यांनी महाभारत काळातील इंटरनेटवरून केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेली चर्चा थांबत नाही तोच त्यांनी माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
डायना हेडनला 21 वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या मिस वर्ल्डच्या विजेतेपदावर बिप्लब देव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विविध स्तरांवर आयोजित होणाऱ्या सौंदर्य स्पर्धा या बोगस असून, हेडन हिला खिताब देण्याची प्रक्रिया समजली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र ऐश्वर्या रॉय हिच्या सौंदर्याचे देव यांनी कौतुक केले आहे. ऐश्वर्या खऱ्या अर्थाने भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते, असे त्यांनी म्हटले आहे. "आम्ही भारतीय महिलांना लक्ष्मी, सरस्वतीच्या रूपात मानतो. ऐश्वर्या रॉय भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व करते. डायना मिस वर्ल्ड बनली, हे ठीक आहे, पण डायना हेडनचे सौंदर्य मला समजलेले नाही.
याआधी केला होता महाभारत काळातही इंटरनेट असल्याचा दावा
भारतात फार जुन्या काळापासून इंटरनेटचा वापर केला जातोय. महाभारताच्या काळात संजय दृष्टिहीन होता. परंतु युद्धाची सर्व हकीकत तो धृतराष्ट्रांना ऐकवत होता. हे इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीमुळेच शक्य झालं आहे, त्या काळात सॅटेलाइटही अस्तित्वात होत्या, असा दावा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी केला होता.
आगरतळ्यातल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही स्तुती केली. नरेंद्र मोदी देशातल्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळेच देशातील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातून जोडली गेली आहे. मोदी लोकांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर वापरकर्ते म्हणूनही ओळखले जातात. भारतीय संस्कृती आणि परंपरा फार पूर्वापारपासून चालत आलेल्या आहेत. तेव्हापासूनच आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, असं म्हणत त्यांनी इंटरनेट महाभारत काळापासून असल्याचे सूतोवाच केले होते.