मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये एका दलित व्यक्तीच्या घरी केले भोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:23 AM2022-01-15T10:23:49+5:302022-01-15T10:24:33+5:30
लखनौच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सपाला नोटीस जारी केली आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि धर्मसिंह सैनी यांच्यासह ८ आमदारांनी शुक्रवारी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत सपात प्रवेश केला. राजीनामा देणारे अन्य मंत्री दारासिंह चौहान रविवारी सपामध्ये दाखल होतील.या नेत्यांच्या प्रवेशासाठी व्हर्च्युअल रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र, हजारो कार्यकर्ते दाखल झाल्याने आयोगाच्या निर्देशांचे पालन झाले नाही.
लखनौच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सपाला नोटीस जारी केली आहे. स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, योगी आदित्यनाथ आणि भाजपा हे दलित आणि मागास वर्गाच्या विरोधात आहेत. बिगर यादव मागास नेते भाजपा सोडून सपामध्ये दाखल होत असल्यामुळे आनंदित झालेल्या अखिलेश यादव यांनी ४०३ पैकी ४०० जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.
योगी आदित्यनाथ यांचे दलिताच्या घरी भोजन
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये एका दलित व्यक्तीच्या घरी भोजन करत दलित वोट बँकेला जवळ करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, भ्रष्टाचार ज्यांच्या रक्तातच आहे ते सामाजिक न्यायाची लढाई लढू शकत नाहीत.
...आणि बसपाचे नेते ढसढसा रडले
मुजफ्फरनगरचे त्यांचे नेते अरशद राणा यांनी ढसाढसा रडत पोलिसात तक्रार दिली की, पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी शमसुद्दीन लाईन यांनी तिकीट देण्यासाठी ६७ लाख रुपये घेतले मात्र, तिकीट दुसऱ्यालाच दिले.