मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार; भाजप, काँग्रेस संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 08:29 AM2022-01-29T08:29:57+5:302022-01-29T08:30:59+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून सुनील जाखड बाहेर पडले आहेत. ते निवडणूक लढविणार नाहीत आणि प्रचारही करणार नाहीत.
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : पंजाबमधील दोन प्रमुख पक्ष संभ्रमात असल्याने काँग्रेस आणि भाजपने अद्याप आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. आम आदमी पार्टीने भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषित केले असून सुखबिर सिंग बादल यांच्या नेतृत्वाखाली शिरोमणी अकाली दल निवडणूक लढविणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून सुनील जाखड बाहेर पडले आहेत. ते निवडणूक लढविणार नाहीत आणि प्रचारही करणार नाहीत. ते स्वित्झर्लंडमध्ये सुटी घालवीत असल्याने मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू या दोघांना आपसात काय ते ठरवायचे आहे. कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अमृतसर भेटीदरम्यान स्पष्ट करून या मुद्याला कलाटणी दिली. चन्नी हे या शर्यतीत बाजी मारतील, असे मानले जाते. ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही सिद्धू सक्षम नसल्याचे म्हटले होते.
चेहरा ठरविताना संघर्ष करावा लागतोय...
भाजपशी युती करणारा अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष आणि सुखदेव सिंग ढिंढसा यांचा शिरोमणी अकाली दल (संयुक्त) या पक्षालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवितांना संघर्ष करावा लागत आहे. भाजपने माजी केंद्रीय मंत्री विजय साम्पला यांना उमेदवारी दिली आहे.