संभाजी भिडे अज्ञानी, त्यांनी भलतीसलती विधानं करू नयेत; राम मंदिराचे मुख्य पुजारी कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 08:15 PM2020-08-04T20:15:48+5:302020-08-04T20:22:38+5:30
राम मंदिरात मिशीवाली मूर्ती बसवण्यात यावी, अशी अपेक्षा संभाजी भिडेंनी व्यक्त केली होती
अयोध्या: अयोध्येत उद्या राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा उद्या संपन्न होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडेंनी अयोध्येतील रामाची मूर्ती मिशीवाली असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मिशी हे पुरुषत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे रामाच्या मूर्तीला मिशी असावी, असं भिडे म्हणाले होते. मात्र अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी भिडेंचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. संभाजी भिडेंनी भलतीसलती विधानं करू नयेत, असंदेखील दास म्हणाले.
प्रभू राम, लक्ष्मण, हनुमान ही पुरुष दैवतं आहेत. पण राम, लक्ष्मण यांची चित्रं काढताना, त्यांच्या मूर्ती साकारताना चित्रकार, शिल्पकारांनी चूक केली की काय असं माझ्या लक्षात येतं. त्यामुळे राम मंदिरात जी मूर्ती बसवली जाईल, ती मूर्ती मिशीवाली असावी. आतापर्यंत झालेली चूक आपण दुरुस्त करणार नसू, तर मंदिर होऊनही न झाल्यासारखंच आहे, असं संभाजी भिडेंनी म्हटलं होतं.
संभाजी भिडेंच्या विधानाचा महंत सत्येंद्र दास यांनी समाचार घेतला आहे. संभाजी भिडे यांनी भलतीसलती विधाने करू नयेत. जर कुठे रामाला मिश्या दाखवल्या गेल्या असतील, तर त्या संभाजी भिडेंसारख्या अज्ञानी लोकांमुळेच, अशा शब्दांत दास यांनी भिडेंवर जोरदार टीका केली. त्यांनी भिडे यांचा उल्लेख अज्ञानी असा केला.
प्रभू रामचंद्रांना कोणत्याही मूर्ती किंवा चित्रात मिशी का दाखवली जात नाही, यावरही दास यांनी भाष्य केलं. 'प्रभू राम, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शीव हे हिंदू धर्मातील अतिशय प्रसिद्ध दैवतं आहेत. या तिन्ही देवांना कधीही दाढी किंवा मिशी दाखवलेली नाही. याचं कारण म्हणजे या तिन्ही देवांना षोडशवर्षीय दाखवण्यात आलं आहे. षोडशवर्षीय म्हणजे १६ वर्षीय. हे देव जोपर्यंत पृथ्वीतलावर राहतील, तोपर्यंत ते कायम १६ वर्षीयच राहणार आहेत', असं दास यांनी सांगितलं.