मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:54 AM2019-11-28T04:54:31+5:302019-11-28T04:54:50+5:30
महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनीही राजीनामा दिला आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तापालटानंतर महाराष्ट्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांनीही राजीनामा दिला आहे. महाराष्ट्राच्या विधि व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना त्यांनी राजीनामा सोपविला.
महाराष्ट्र सरकारने २०१५ मध्ये अॅड. निशांत कातनेश्वरकर यांची सर्वोच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचा २०१८ मध्ये संपल्यानंतर त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली. ती मुदत २९ जून २०२१ पर्यंत होती. मात्र, राज्यातील राजकीय चित्र बदलल्याने त्यांनी राजीनामा दिला.
हे राजकीय पद नसले तरीही राजीनामा देणे माझी नैतिक जबाबदारी होती आणि ती मी पार पाडली, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यापुढे सर्वोच्च न्यायालयात खासगी वकिली सुरू राहणार असल्याचेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय, इतर न्यायालये, तसेच लवादात महाराष्ट्राचा मुख्य सरकारी वकील म्हणून सेवा देण्याची संधी मिळाली, याबाबत मी आभारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.