मुख्य सचिवांच्या आप्तांकडे नव्या नोटांचे निघाले घबाड
By admin | Published: December 22, 2016 04:47 AM2016-12-22T04:47:35+5:302016-12-22T04:47:35+5:30
तामिळनाडुचे मुख्य सचिव पी. राम मोहन राव यांचे येथील निवासस्थान व त्यांचा मुलगा आणि इतर नातेवाईकांच्या घरांसह
चेन्नई : तामिळनाडुचे मुख्य सचिव पी. राम मोहन राव यांचे येथील निवासस्थान व त्यांचा मुलगा आणि इतर नातेवाईकांच्या घरांसह १२ ठिकाणी बुधवारी प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे घालून झडती घेतली. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही कारवाई सुरू झाली. त्यांचा मुलगा आणि नातेवाईकांकडून १८ लाख रुपये किंमतीच्या नव्या नोटा आणि दोन किलो साने सापडले. येथील अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.
यापूर्वी प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी शेखर रेड्डी यांच्या निवासस्थानी व आस्थापनांवर छापे मारून ३४ कोटींच्या नव्या नोटांसह १५४ कोटी रुपये रोख आणि १६७ किलो सोने इतका ऐवज हस्तगत केला होता. शेखर रेड्डी यांना आज अटक करण्यात आली. शेखर रेड्डी यांचे आणि राम मोहन राव यांच्याशी संबंध असल्याचे बोलले जाते.
राव यांचा मुलगा व त्यांच्या नातेवाईकांनी कर चुकवेगिरी केल्याशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. राव यांच्या निवासस्थानी २०-२० अधिकाऱ्यांच्या दोन तुकड्यांनी छापे घातले. तामिळनाडू आणि शेजारच्या आंध्र प्रदेशातील राव तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित अनेक ठिकाणांची प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. राव यांची यावर्षी जून महिन्यात अखिल भारतीय अण्णा द्रमुक सरकारने मुख्य सचिवपदी नियुक्ती केली होती. (वृत्तसंस्था)
ही कारवाई सूडाची-
तमिळनाडुचे मुख्य सचिव रामा मोहन राव यांच्या निवासस्थानी प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यांबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर बुधवारी जोरदार टीका केली. ही कारवाई सूडबुद्धीची, अनैतिक व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.