नवीन कार देत नाही म्हणून मुलाने आई-वडिलांवर केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 11:21 AM2017-08-21T11:21:46+5:302017-08-21T14:34:45+5:30
आई-वडिलांनी नवीन कार घेऊन द्यायला नकार दिला म्हणून एका 23 वर्षाच्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आपल्या पालकांवरच हल्ला केला.
बंगळुरु, दि. 21 - आई-वडिलांनी नवीन कार घेऊन द्यायला नकार दिला म्हणून एका 23 वर्षाच्या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आपल्या पालकांवरच हल्ला केला. पश्चिम बंगळुरुच्या राजाजीनगरमध्ये 15 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. वडिल बी.जी. चंद्रहाय यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी बी.सी.विनयला अटक केली आहे. तो खासगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कॉम्युटर सायन्सच्या शाखेमध्ये शिक्षण घेत आहे. बी.जी. चंद्रहाय हे जमीनदार आणि छोटे कंत्राटदार आहेत.
आई-वडिल नवीन कार देत नाही म्हणून स्वातंत्र्यदिनी विनयने घरात आकांड-तांडव केले. त्याने घरातील टीव्ही, मोबाईल आणि शो केस फोडला. या दरम्यान शो केसची काच डोळयाला लागून विनयची आई जखमी झाली. वडिलांनी रोखण्याचा प्रयत्न करताना विनयने त्यांनाही मारहाण केली. विनय घरातील मोठा मुलगा असून त्याचा लहान भाऊ मदनने बारावी झाल्यानंतर शिक्षण सोडून दिले.
मदन वडिल चंद्रहाय यांनी उद्योगामध्ये मदत करत होता. वर्षभरापूर्वी चंद्रहाय यांनी मदनला नवीन जीप विकत घेऊन दिली. तेव्हापासून विनयने आई-वडिलांकडे नवीन कार विकत घेऊन देण्याचा तगादा लावला होता. कारच्या मागणीवरुन विनयचे घरात दररोज आई-वडिलांबरोबर भांडण सुरु होते. स्वातंत्र्यदिनी दुपारी 2 च्या सुमारास या वादाने टोक गाठले. विनयने आई-वडिलांकडे नव्या कारची मागणी केली. नेहमीप्रमाणे त्याला नकार मिळताच
विनय संतापला. त्याने घरात आदळ-आपट सुरु केली अशी माहिती सुब्रमण्यम नगर पोलिसांनी दिली. वडिल आणि मुलामधला संघर्ष पोलिसांना अजिबात नवीन नाही. यापूर्वी दोनवेळा चंद्रहाय यांनी मुलाकडून होणा-या त्रासाबद्दल पोलिसांकडे धाव घेतली होती. पण पोलिसांनी इशारा देऊन विनयला सोडले. यावेळी मात्र पोलिसांनी चंद्रहाय यांना तक्रार करायला लावली. आई-वडिलांना मारहाण त्यांना धमकावणे या आरोपांखाली पोलिसांनी विनय विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाच कलमातंर्गत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
विनयने माफी मागितल्यामुळे चंद्रहाय यांना आता मुलाविरोधातील तक्रार मागे घ्यायची आहे. पण विनयला अटक करुन पुढची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे तक्रार मागे घेणे शक्य नाही. आता यापुढे सर्व काही कोर्टाच्या हातात आहे असे तपास अधिका-यांनी सांगितले.