ह्दयद्रावक! उपचाराविना ६ तास दिल्लीच्या रस्त्यावर भटकले; अखेर रुग्णवाहिकेतच चिमुकल्याने जीव सोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 10:34 AM2021-04-03T10:34:56+5:302021-04-03T10:36:30+5:30
या रुग्णालयात १० मिनिटे डॉक्टरांच्या टीमने मुलावर उपचार केले आणि आईवडिलांनी पुढील उपचारासाठी एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला.
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या सरकारी हॉस्पिटलमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. ज्याठिकाणी डॉक्टरांवर बेजबाबदारपणाचा आरोप लावण्यात आला आहे. मजनू का टिला नावाच्या परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याचा दीड वर्षाचा मुलगा घराच्या चौथ्या मजल्यावरून अचानक खाली पडला, त्यानंतर या धावपळीत त्याला आईवडिलांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं.
या रुग्णालयात १० मिनिटे डॉक्टरांच्या टीमने मुलावर उपचार केले आणि आईवडिलांनी पुढील उपचारासाठी एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला. कारण या रुग्णालयात व्हेटिंलेटरचा अभाव आहे. आई वडिलांनी रुग्णावाहिकेतून लहानग्या चिमुरड्याला घेऊन दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालय गाठलं, येथील डॉक्टरांनी आईवडिलांना ताटकाळत ठेवत शेवटी याठिकाणी बेड उपलब्ध नसल्याचं सांगत एम्सला जावा, म्हटलं, मुलाच्या चिंतेत असणारे आईवडील पुन्हा मुलाला घेऊन एम्सला पोहचले. येथेही डॉक्टरांनी बेड उपलब्ध नसल्याचं सांगत एम्सच्या ट्रामा सेंटरला जाण्यास सांगितले.
ज्यावेळी आईवडील जखमी अवस्थेत मुलाला घेऊन ट्रामा सेंटरमध्ये पोहचले तेव्हा तिथेही बेड उपलब्ध नव्हता. त्यानंतर मुलाला घेऊन आरएमएल हॉस्पिटलला गेले, तेथेही डॉक्टरांनी सहकार्य न करता दुसऱ्या रुग्णालयात मुलाला घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर आईवडील मुलाला दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात घेऊन आले, तेथे आयसीयू बेड नव्हता. दिल्लीच्या रस्त्यावर ६ तास भटकत असलेल्या आईवडिलांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मुलाला पळवावं लागलं. अखेर रुग्णवाहिकेत ऑक्सिजन संपल्यानंतर मुलाने अखेरचा श्वास घेतला.
राजधानी दिल्लीत अशाप्रकारे घडलेल्या भयंकर प्रकारामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभे आहेत, मुलाचा जीव गेल्यानंतर आईवडिलांनी हंबरडा फोडला, मोठ-मोठ्या हॉस्पिटलच्या चक्करा मारूनही मुलावर उपचार करता आले नाहीत, त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला.