दोन वेण्यांची सक्ती करणे हे बालहक्कांचे उल्लंघन!
By admin | Published: August 22, 2016 05:11 PM2016-08-22T17:11:06+5:302016-08-22T17:17:18+5:30
मुलींनी शाळेत येताना केसांच्या दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे हे विद्यार्थिनींच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निकाल केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला
विद्यार्थिनींना दिलासा: केरळ बालहक्क आयोगाचा निकाल
थिरुवनंतपुरम: मुलींनी शाळेत येताना केसांच्या दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे हे विद्यार्थिनींच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निकाल केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला असून शाळांनी अशी सक्ती करू नये, असा आदेश दिला आहे.
कासरगोड जिल्ह्यातील चिमीनी येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलीने केलेल्या तक्रारीवर आयोगाच्या अध्यक्षा शोभा कोशी आणि सदस्य के. नासिर व सी.यू. मीना यांनी हा निर्णय दिला. मात्र विद्यार्थिनींनी शाळेत येताना पिंजारलेल्या केसांनी न येता ते व्यवस्थित विंचरून आणि वर एकत्र बांधून यावे, असा नियम शाळा करू शकतात, असे आयोगाने स्पष्ट केले. शाळांनी दोन वेण्यांचा आग्रह करू नये, असा आदेश राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने जारी करावा, असे निर्देश आयोगाने दिले.
केरळमधील मुली आठवड्यातून एकदा नव्हे तर दररोज केसावरून आंघोळ करतात, या पार्श्वभूमीवर या विद्यार्थिनीने आयोगाकडे तक्रार केली होती. तिचे म्हणणे असे होते की, सकाळी शाळेत येण्याच्या घाईच्या वेळी केस नीट न वाळवता त्यांच्या घट्ट वेण्या बांधल्या तर केसांना कुबट वास येतो. शिवाय केसांत कोंडा होतो व खाज सुटून डोक्यावर चट्टे उठतात. यावर उपाय म्हणून अनेक मुली आंघोळ न करताच शाळेत येतात.
शिवाय मुलांनी केस कसे राखावेत याविषयी कोणताही नियम नसताना फक्त मुलींनाच दोन वेण्या घालून शाळेत येण्याचा आग्रह धरणे हा लिंगभेदी पक्षपात आहे, असेही प्रतिपादन या तक्रारीत करण्यात आले होते.
तक्रारदाराशी सहमती दर्शवित आयोगाने म्हटले की, सकाळी लवकर उठून मुलींनी स्वत:चे सर्व आवरायचे, राहिला असेल तर गृहपाठ पूर्ण करायचा आणि या सर्व घाईगर्दीत वेण्याही घालायच्या हे खूपच अडचणीचे आहे. शिवाय हल्ली बहुतांश आयाही नोकरी करीत असल्याने सकाळच्या वेळी त्यांचीही घाई असते, त्यामुळे त्यांनाही मुलीच्या वेण्या घालून देणे शक्य होईलच असे नाही. अशा परिस्थितीत शाळांनी दोन वेण्यांचा आग्रह धरणे हे विद्यार्थिनींच्या शारीरिक आणि मानसिक तणावात भर टाकणारे असल्याने हे त्यांच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे.
कासरगोड जिल्हा बाल सुरक्षा अधिकारी के. बाबू यांनी या तक्रारदार मुलीच्या शाळेत जाऊन चौकशी केला असता बहुसंख्य विद्यार्थिनींचा दोन वेण्यांच्या सक्तीला विरोध असल्याचे दिसले होते. त्यांनी तसा अहवाल आयोगास दिला होता.
केस लांबसडक असतील तर व्यवस्थित वेणी घालता येते व ती दिवसभर न सुटता चांगली घट्ट राहते. आखूड केसांच्या दोन वेण्या घातल्या तर त्या शेंडीसारख्या दिसतात व त्यामुळे आपण ‘ध्यान’ दिसतो याचे मुलींच्या मनावर कायम दडपण येते, असे
के. नासिर, सदस्य, केरळ बालहक्क आयोग यांनी सांगितले.