बालविवाहाच्या जोखडातून ‘ती’ मुक्त!
By Admin | Published: June 25, 2016 03:02 AM2016-06-25T03:02:19+5:302016-06-25T03:02:19+5:30
अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीने प्रचंड धाडसाचे प्रमाण देत बळजबरीने करण्यात आलेल्या विवाहाच्या बंधनातून स्वत:ला मुक्त केले
इटानगर : अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीने प्रचंड धाडसाचे प्रमाण देत बळजबरीने करण्यात आलेल्या विवाहाच्या बंधनातून स्वत:ला मुक्त केले. या घटनेमुळे खेडेगावांत बालविवाहाची कुप्रथा कायम असल्याचे उघड झाले.
या साहसी मुलीचे नाव आहे जेरोनी टावो. इ.स.२०१३ साली तिचा बालविवाह झाला होता. येथील महिला कल्याण संघटनेच्या मदतीने तिने हे धाडसी पाऊल उचलले. संघटनेच्या महासचिव पूजा सोनम नातुंग यांनी जेरोनीची ही साहस कथा विषद केली.
जेरोनी अवघ्या पाच वर्षांची असतानाच २००८ साली तिच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या होत्या. त्यावेळी तिच्या आईवडिलांनी तिचा विवाह तिच्यापेक्षा वयाने फार मोठ्या असलेल्या इसमासोबत करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार तालिंग पिंचे नामक व्यक्तीसोबत तिचा विवाह झाला. बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथांविरुद्ध पूर्व कामेंग जिल्ह्यात महिला संघटनांनी जागरूकता मोहीम राबविली होती. त्यातून ती प्रेरित झाली होती. (वृत्तसंस्था)