१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 06:13 AM2024-05-29T06:13:02+5:302024-05-29T06:13:41+5:30
पुणे-दिल्लीतील १३ बालकांची सुटका
हैदराबाद : बालकांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा तेलंगणाच्या रचकोंडा पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी ११ जणांना अटक केली असून त्यात ८ महिला आहेत. त्यांनी पुणे व दिल्ली येथील व्यक्तींकडून ही बालके विकत घेतली होती. त्यांच्या ताब्यातील १३ बालकांची पोलिसांनी मुक्तता केली असून या बालकांमध्ये चार मुलगे व नऊ मुली आहेत.
या प्रकरणी मन्याम साई कुमार यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गेल्या २२ मेपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. पुणे व दिल्लीतील ज्या माता-पित्यांना आपले बालक नको होते, त्यांच्याकडून या टोळीतील महिलांनी बालकांना विकत घेतले होते. त्यासाठी त्यांनी प्रत्येक बालकामागे ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत किंमत मोजली होती. या प्रकरणी शोभाराणी, स्वप्ना, शेख सलीम अशांसह ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महिला डॉक्टरकडून बालकाची विक्री
पोलिसांनी मुक्त केलेल्या बालकांचे वय दोन महिने ते दोन वर्षांपर्यंत आहे. २२ मे रोजी शोभाराणी या महिला डॉक्टरने एक बालक साडेचार लाख रुपयांना विकले. त्या प्रकरणी तिला अटक केल्यानंतर बालकांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांना सुगावा लागला.
एक ते साडेपाच लाख रुपयांना विकले बालकांना
- आंध्र प्रदेश व तेलंगणातील ज्या दाम्पत्यांना अपत्य हवे होते, अशा लोकांना या टोळीने आतापर्यंत सुमारे ५० बालके विकली असावीत, असा पोलिसांचा कयास आहे. या टोळीकडून अधिक माहिती मिळवून रचकोंडा पोलिस या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढणार आहेत.
- अपत्याची आस असलेल्या दाम्पत्यांना ही बालके प्रत्येकी १ लाख ८० हजार ते ५ लाख ५० हजार रुपयांची किंमत आकारून विकण्यात आल्याची धक्कादायक माहिती आतापर्यंतच्या तपासात उघड झाली आहे. या प्रकरणातील काही आरोपी फरार असूनही त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.