१० वर्षांवरील मुले उघडू शकतात बॅकेत खाते
By admin | Published: May 7, 2014 12:08 PM2014-05-07T12:08:25+5:302014-05-07T12:29:23+5:30
रिझर्व्ह बॅकेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार दहा वर्षांवरील मुले आता कोणत्याही बॅकेत बचत खाते उघडू शकतात.
Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - वयाची दहा वर्षे पूर्ण केलेल्या मुलांना आता बॅकेत बचत खाते उघडण्यासाठी व ते ऑपरेट करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. रिझर्व्ह बॅकेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार दहा वर्षांवरील मुले आता कोणत्याही बॅकेत बचत खाते उघडू शकतात तसेच त्याचे व्यवहारही करू शकतात. त्याचसोबत त्यांना इंटरनेट बॅकिंग, एटीएम व चेकबुकचे व्यवहार या सुविधांचा वापर करण्याचा अधिकार मिळाला आहे.
यापूर्वी अल्पवयीन मुलांना त्यांच्या पालकांमार्फत मुदत ठेव आणि बचत खाते उघडायची मुभा रिझर्व्ह बँकेने दिली होती. त्यात आता सुधारणा करण्यात आली असून, अल्पवयीन मुले आता आपल्या नैसर्गिक पालकांच्या किंवा कायदेशीर नियुक्त पालकाच्या मार्फत बचत खाते, मुदत ठेव आणि पुनरावर्ती ठेव खाती उघडू शकतात. मात्र यातील जोखीम लक्षात घेता अल्पवयीन मुलांच्या वयाचीव खात्यातील रकमेची मर्यादा ठरवण्याचे अधिकार बँकांना असतील, अशी पुस्तीही रिझर्व्ह बॅंकेने जोडली आहे. तसेच इंटरनेट बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, चेकबुक यांसारख्या सुविधा देतानाही त्यावर बँकांची बारीक नजर राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.