आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलांनी भीक मागून जमवले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 03:18 PM2018-02-08T15:18:38+5:302018-02-08T15:18:54+5:30
आपल्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने मुलांना भीक मागावी लागल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे
चेन्नई - आपल्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नसल्याने मुलांना भीक मागावी लागल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूत घडली आहे. सरकारी रुग्णालयात ब्रेस्ट कॅन्सर पीडित विजया (40) यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांची दोन्ही मुले मोहन (14) आणि वेलमुरुगन (13) तिथेच उपस्थित होते. खिशात दमडी नसल्याने आपल्या आईवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न त्यांना पडला. यानंतर त्यांनी नाइलाजास्तव रुग्णालयात इतर रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैसे मागण्यास सुरुवात केली.
मृत पावलेल्या विजया मजुरी करायच्या. नऊ वर्षांपुर्वी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. आपली दोन मुलं आणि एका मुलीचं पोट भरण्यासाठी त्या रोजंदारीवर काम करत होत्या. घरातील हालाखीची परिस्थती पाहता मुलांनीही खेळण्याचा वयात आईसोबत मजुरी करण्यास सुरुवात केली होती.
काही महिन्यांपुर्वीच विजय यांनी ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं कुटुंबियांना समजलं. आधीच घरी अठराविश्वं दारिद्र्य असताना ही बातमी ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. इथे दोन वेळ खाण्याचा प्रश्न मिटता मिटत नसताना उपचार करायचा कसा हा प्रश्न सर्वांसमोर उभा होता. विजय यांच्या मदतीसाठी एकही नातेवाईक पुढे आला नाही. त्यांनी आपली मुलगी कलिश्वरीलाही चाइल्ड केअर सेंटरमध्ये पाठवून दिलं होतं.
शेजा-यांच्या मदतीने मुलांनी विजया यांना डिंडीगुल येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं. पण अखेर विजया यांचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही अडचणी संपलेल्या नव्हत्या. आपल्या आईवर अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न त्यांच्या मुलांसमोर होता. खिशात काहीच पैसे नसल्याने दोन्ही मुलांनी रुग्णालयात भीक मागण्यास सुरुवात केली. त्यांची परिस्थिती पाहून काहीजणांनी त्यांना मदतही केली.
रुग्णालयातील वेलफेअर असोसिएट डायरेक्टर मालती प्रकाश यांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी सहानुभूती व्यक्त करत अंत्यसंस्कारासाठी मदत केली.