नोकरी करणाऱ्या जोडप्यांची मुले बोलेनात! हातातील मोबाइल दूर ठेवून त्यांच्याशी बोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 05:48 AM2024-07-27T05:48:31+5:302024-07-27T05:48:51+5:30
ऑटिज्म डिसऑर्डर सध्या मोठी समस्या बनत आहे. आमच्याकडे सध्या अनेक लहान मुले येत आहेत, ज्यांना एकच शब्द बोलता येतो. - डॉक्टर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सध्या पती, पत्नी आणि एक मूल अशी परिवाराची व्याख्या बनत चालली असून, याचा परिणाम निष्पाप मुलांवर होत आहे. पती आणि पत्नी हे दोघेही दिवसभर ऑफिसमध्ये आणि नंतर घरी आल्यानंतर सोशल मीडियावर व्यस्त राहत असल्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देत नाहीत. ऑटिज्म डिसऑर्डर सध्या मोठी समस्या बनत आहे. आमच्याकडे सध्या अनेक लहान मुले येत आहेत, ज्यांना एकच शब्द बोलता येतो. आई-वडील त्यांच्यासोबत संवाद साधत नसल्याचा हा मोठा परिणाम आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.
मुलांना तुमच्याशी बोलायचेय
एकटेपणा मुलांच्या विकासावर परिणाम होत आहे. चार वर्षांची आर्या केवळ काहीच शब्द बोलते; मात्र, तिच्या वयातील इतर मुले पूर्ण वाक्य तयार करू शकतात. अनेक थेरपी करूनही तिच्यामध्ये सध्या सुधारणा होत नाहीये.
डॉक्टरांनी सांगितले की, आर्याला कुणाशीतरी बोलायचे आहे, संवाद साधायचा आहे, त्यासाठी ती वाट पाहत असते; मात्र, तसे होत नसल्याने ती पूर्ण वाक्यही बोलू शकत नाही.
नोकरीतील सुट्टी आणि तिच्या वयाच्या इतर काही मुलांसोबत सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही समस्या आर्यामध्येच नाही, तर इतर मुलांमध्ये आहे. एलकेजी आणि यूकेजीच्या १० टक्के मुलांमध्ये ही समस्या आहे. त्यामुळे पालकांनी मुलांंशी संवाद साधणे गरजेजे आहे.
आई-वडील आणि मुलगा या त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेचा मुलांवर मोठा परिणाम होत आहे. अनेक वेळा मुलांच्या मेंदूचा पूर्ण विकास झालेला नसतो. म्हणून वयानुसार वाढ होत नाही. अशा मुलांची थेरपी लवकरात लवकर सुरू करावी.
- डॉ. राकेश मिश्रा,
बालरोग तज्ज्ञ
ही आहेत लक्षणे
९ महिन्यांच्या बाळाचे नाव ऐकल्यानंतर प्रतिक्रिया न येणे
आनंद, दुःख, आश्चर्य, राग यावर व्यक्त न होणे
१२ महिन्यांत सामान्य खेळ न खेळता येणे
तीन वर्षांपर्यंतचे मूल फक्त एकच शब्द बोलते. जसे दूध, आई, बाबा
काय आहेत कारणे?
पालक दोघेही कामावर असल्याने मुलांशी बोलायला कोणीही नसते.
गर्भधारणेदरम्यान धोकादायक व्हायरल इन्फेक्शन, आवश्यक घटकांची कमतरता, अमली पदार्थांचे व्यसन किंवा जास्त प्रदूषण.
मुले मोबाइल, टीव्ही आदींच्या मदतीने वेळ घालवत आहेत.