‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 06:40 AM2024-06-11T06:40:56+5:302024-06-11T06:41:21+5:30

Jammu Bus Attack: एकीकडे दहशतवादी आमच्या बसवर बेछूट गाेळीबार करत हाेते. मी मुलांना बसमधील आसनांच्या खाली लपविले आणि स्वत: खाली वाकून हाेताे. ते भयावह २०-२५ मिनिटे आयुष्यात विसरू शकणार नाही, हे शब्द आहेत जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या भवानी शंकर यांचे.

'Children were saved by hiding', says father of bus attack survivor | ‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव

‘मुलांना लपविले म्हणून वाचले’, बसवर झालेल्या हल्ल्यातून बचावलेल्या पित्याने सांगितला भयावह अनुभव

 नवी दिल्ली/जम्मू - एकीकडे दहशतवादी आमच्या बसवर बेछूट गाेळीबार करत हाेते. मी मुलांना बसमधील आसनांच्या खाली लपविले आणि स्वत: खाली वाकून हाेताे. ते भयावह २०-२५ मिनिटे आयुष्यात विसरू शकणार नाही, हे शब्द आहेत जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या भवानी शंकर यांचे. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला तर ४१ जण जखमी झाले.

शंकर हे दिल्लीतील रहिवासी. पत्नी राधा देवी, दाेन लहान मुलांसह ते शिव खाेडी येथे या बसमधून जात हाेते. दहशतवाद्यांनी १० ते १५ सेकंदांमध्ये २० ते २५ गाेळ्या बसवर झाडल्या. एक गाेळी बसचालकाला लागली आणि त्यामुळे बस अनियंत्रित झाल आणि दरीत खडकांमध्ये अडकली. काही जण ‘हमला हाे गया हैं’, असे ओरडू लागल्याचे शंकर यांनी सांगितले.  

बहीण-भावांना आई-वडिलांची प्रतीक्षा
मृतांमध्ये जयपूरचे  कापड व्यापारी राजेंद्र सैनी (४२), त्यांची पत्नी ममता (४०), त्यांची नातेवाईक पूजा सैनी (३०) आणि तिचा दोन वर्षांचा मुलगा टीटू यांचा समावेश आहे. याशिवाय शिवम गुप्ता, रुबी आणि १४ वर्षीय अनुराग वर्मा (सर्व रा.  उत्तर प्रदेश) यांचाही मृत्यू झाला आहे. ममता आणि राजेंद्र सैनी यांची तीन मुले वैष्णोदेवी यात्रेवरून त्यांचे आई-वडील परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

तीन संघटनांनी घेतली हल्ल्याची जबाबदारी 
पीपल्स ॲंटी रेसिस्ट फाेर्स, रिव्हायवल ऑफ रिझिस्टन्स आणि द रेझिस्टंट फाेर्स या लष्कर-ऐ-ताेयबा आणि जैश-ए-माेहम्मद या दहशवादी संघटनांशी संबंधित संघटनांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली हाेती. मात्र, नंतर त्यांनी जबाबदारी झटकली. 

तीन दहशतवाद्यांनी केला हल्ला, विदेशी रायफलचा केला वापर
जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात प्रवासी बसवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), राज्य तपास यंत्रणा (एसआयए) आणि फॉरेन्सिक विभागाच्या पथकांनी दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी भेट दिली आणि तपास सुरू केला. 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात तीन पाकिस्तानी दहशतवादी सामील हाेते. त्यांनी ‘एम४’ रायफलींचा वापर केला. आणखी दाेन दहशतवादी रियासी जिल्ह्यात अद्यापही लपून आहेत. दहशतवाद्यांनी सुरंगातून नियंत्रण रेषा पार केली. सर्वप्रथम त्यांनी राजाैरी आणि पुंछमधील जंगलांमध्ये रेकी केली हाेती. घनदाट जंगलामुळे सुरक्षा दलांना शाेधमाेहिमेमध्ये अडथळे निर्माण हाेत आहेत.
 

Web Title: 'Children were saved by hiding', says father of bus attack survivor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.