Children's Day : चिमुकल्यांना गुगलने आकर्षक डुडलद्वारे दिल्या खास शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 08:50 AM2018-11-14T08:50:05+5:302018-11-14T08:57:34+5:30
गुगलने बालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो.
नवी दिल्ली - गुगल नेहमीच एक खास डुडल तयार करून अनेक मान्यवरांना सलाम करत असतं. यावेळीही गुगलनेबालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार करून सर्वांचच मन जिंकलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालदिनाच्या निमित्ताने गुगलने बच्चे कंपनीला डुडलच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या आहेत. लहान मुले आणि पंडित नेहरुंनी देशाला दिलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाची भेट या दोन्ही गोष्टींवर गुगलने खास डुडल तयार केले आहे.
ग्रह तारे, अवकाश यान, आकाशगंगा या सर्वांचे जिज्ञासू वृत्तीने निरिक्षण करणारी एक लहान मुलगी डूडलमध्ये दिसत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती देताना आकाशात ग्रह-तारे, आकाशगंगा, सप्तर्षी दाखवण्यात आली आहे. तसेच आकाशात झेपावण्यासाठी सज्ज असलेले एक अवकाश यानही दाखवण्यात आले.
14 नोव्हेंबर 1889 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म झाला. नेहरुंना लहान मुले खूप आवडत असल्याने ते चाचा नेहरु म्हणून ओळखले जात होते. 27 मे 1964 रोजी नेहरुंचे निधन झाले. लहान मुलांप्रती असलेले त्यांचे प्रेम लक्षात घेता नेहरुंच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ भारतातच नाही तर जगभरात बालदिन उत्साहात साजरा केला जातो. मात्र विविध देशांमध्ये तो वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो.