अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर अदर पुनावालांची मोठी घोषणा! लहान मुलांसाठीची लस ऑक्टोबरमध्ये येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 06:57 PM2021-08-06T18:57:00+5:302021-08-06T18:57:49+5:30
Adar Poonawalla: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
Adar Poonawalla: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर पुनावाला यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सीरममध्ये उत्पादन केली जाणारी कोवोव्हॅक्स (Covovax) लस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उपलब्ध होणार असल्याची महत्वाची माहिती दिली आहे. कोवोव्हॅक्स लस १२ वर्षांवरील मुलांना देता येणार आहे. इतकंच नव्हे, तर २०२२ मध्ये पहिल्या तिमाहीत १२ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांसाठी देखील लस बाजारात उपलब्ध होईल असा विश्वास पुनावाला यांनी व्यक्त केला आहे. (Children's vaccine Covovax will be launched in the first week of October, SII CEO Adar Poonawalla announced after meeting Amit Shah)
आर्थिक बाबतीत कोणतीच अडचण नसून भारत सरकार पूर्णपणे सहकार्य करत असल्याचंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे. लसीच्या पुरवठ्याबाबत विचारण्यात आलं असताना अदर पुनावाला यांनी दरमहिन्याला सीरमकडून १३ कोटी लसींचा पुरवठा केला जात असल्याची माहिती दिली.
कोवोव्हॅक्स लसीची दोन ते १७ वर्षांच्या मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या परवानगीची मागणी केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार देशात १० ठिकाणी एकूण ९२० मुलं चाचणीत सहभागी होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. यात १२ ते १७ आणि २ ते ११ वयोगटातील प्रत्येकी ४६० मुलांचा समावेश आहे.
नोवाव्हॅक्सच्या लेट स्टेज ट्रायलमधले परिणाम अत्यंत चांगले दिसून आले आल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोना विषाणूच्या मध्यम आणि गंभीर स्वरुपातील लागण झालेल्या रुग्णांविरोधात लस ९०.४ टक्के परिणामकारक ठरली आहे.