मंत्री ताफ्यातील कारच्या धडकेने चिमुकला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:13 AM2017-10-30T03:13:39+5:302017-10-30T03:13:48+5:30
उत्तर प्रदेशचे मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या ताफ्यातील कारच्या धडकेने पाच वर्षांच्या मुलाच्या झालेल्या मृत्युच्या घटनेचा अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागवला आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशचे मंत्री ओम प्रकाश राजभर यांच्या ताफ्यातील कारच्या धडकेने पाच वर्षांच्या मुलाच्या झालेल्या मृत्युच्या घटनेचा अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागवला आहे.
कर्नलगंजनजिक (जिल्हा गोंडा) शनिवारी झालेल्या या घटनेच्या वेळी मी त्या ताफ्यातून प्रवास करीत नव्हतो, असे राजभर यांनी ठासून सांगितले. उत्तर प्रदेशात नगर पंचायतींच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घटनेवरून विरोधी पक्षांनी सरकारवर हल्ले सुरू केले आहेत. राजभर यांच्या वाहनांच्या ताफ्यातील एक कार कर्नलगंजमधून जाताना शिवा गोस्वामी या मुलाला धडकली. त्याला रुग्णालयात नेण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
ही घटना पाहणारे आणि मुलाच्या कुटुंबियांनी ताफ्यातील कोणीही मुलाच्या मदतीसाठी थांबले नसल्याचा आरोप केला. मुलाचे वडील विश्वनाथ यांनी मंत्री राजभर हे फुलांच्या माळांनी सजवलेल्या एका कारमधून निघून गेल्याचा आरोप केला. तथापि, ही घटना घडली त्यावेळी मी २५ किलोमीटर दूर होतो, असा दावा मंत्र्यांनी केला. मुलगा रस्त्याच्या बाजुला खेळत असताना ताफ्यातील एका कारने त्याला धडक दिली तेव्हा त्याची आई आणि आजी जवळच होती. संतापलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून कारवाईची मागणी केली.