चीनसुद्धा 1962 चा राहिलेला नाही, भारताला प्रत्युत्तर
By admin | Published: July 3, 2017 09:08 PM2017-07-03T21:08:53+5:302017-07-03T22:04:28+5:30
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी अरूण जेटलींच्या विधानाला प्रत्युत्तर...
Next
>ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 3 - भारत आणि चीनचे सैन्य सिक्कीम आणि भूटानमध्ये आमनेसामने आल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. दोन्ही देशांमध्ये एकमेकांविरोधात विधानं करण्याचं सत्र सुरू झालं आहे. ‘भारताने 1962 मधील पराभव विसरु नये,’ असा इशारा काही दिवसांपूर्वी चीनकडून देण्यात आला होता. चीनच्या या विधानाला ‘भारत आता 1962 सारखा राहिलेला नाही,’ असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिले होते. जेटलींना प्रत्युत्तर देताना चीनसुद्धा 1962 चा राहिलेला नाही असं चीनने म्हटलं आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता गेंग शुआंग यांनी सोमवारी जेटलींच्या विधानाला प्रत्युत्तर देताना चीनमध्येही खूप बदल झाला आहे, 1962 चा चीन आता राहिलेला नाही अशा शब्दांमध्ये धमकी दिली आहे. तसेच पेईचिंग आपल्या सार्वभौमत्वासाठी आणि संरक्षणासाठी कोणतेही पाऊल उचलू शकतो, अशी धमकी शुआंग यांनी दिली.
काय म्हणाले होते जेटली-
"जर ते आम्हाला 1962 ची आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असतील तर 1962 ची परिस्थिती वेगळी होती आणि 2017 चा भारत वेगळा आहे"".
शुआंग यांचं जेटलींना प्रत्युत्तर-
""2017 चा भारत हा 1962 पेक्षा वेगळा आहे, हे ते अगदी बरोबरच बोलत आहेत, पण त्याचप्रमाणे चीनपण खूप बदलला आहे. असं म्हणत त्यांनी एकाप्रकारे भारताला पुन्हा धमकावलं आहे""
स्वभूमीच्या रक्षणासाठी युद्धाचीही तयारी, चीनने धमकावलं-
यापूर्वी भारत आणि चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या वृत्तपत्राने भारताला इशारा दिला आहे. आपल्या भूभागाच्या रक्षणासाठी वेळ पडली तर भारताशी युद्धही करेल, असा इशारा ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या लेखामधून देण्यात आला आहे. चीनमध्ये मीडिया सरकारी आहे आणि अशा विधानांना थेट सरकारच्या धोरणाशी जोडून पाहिलं जातं. ‘चीन स्वतःच्या संरक्षणासाठी आणि सार्वभौमत्वासाठी आणि निकराने लढा देईल. यासाठी वेळ पडली तर भारतीय सैन्याविरुद्ध युद्ध करावे लागले, तरीही चालेल, प्रसंगी युद्ध करुन चीन आपल्या भूमीचे संरक्षण करेल, आम्ही तयार आहो’ असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.