स्वभूमीच्या रक्षणासाठी युद्धाचीही तयारी, चीनने धमकावलं
By admin | Published: July 3, 2017 05:09 PM2017-07-03T17:09:16+5:302017-07-03T17:10:37+5:30
‘चीन स्वतःच्या संरक्षणासाठी आणि सार्वभौमत्वासाठी आणि निकराने लढा देईल. यासाठी वेळ पडली तर...
Next
>ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 3 - चीनने पुन्हा एकदा भारताला धमकावलं आहे. भारत आणि चीनचे सैन्य सिक्कीम आणि भूटानमध्ये आमनेसामने आल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारत आणि चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या वृत्तपत्राने भारताला इशारा दिला आहे. आपल्या भूभागाच्या रक्षणासाठी वेळ पडली तर भारताशी युद्धही करेल, असा इशारा ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या लेखामधून देण्यात आला आहे.
चीनमध्ये मीडिया सरकारी आहे आणि अशा विधानांना थेट सरकारच्या धोरणाशी जोडून पाहिलं जातं. ‘चीन स्वतःच्या संरक्षणासाठी आणि सार्वभौमत्वासाठी आणि निकराने लढा देईल. यासाठी वेळ पडली तर भारतीय सैन्याविरुद्ध युद्ध करावे लागले, तरीही चालेल, प्रसंगी युद्ध करुन चीन आपल्या भूमीचे संरक्षण करेल, आम्ही तयार आहो’ असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. यावेळी चीनकडून केवळ सीमावाद नाही तर अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विधानालाही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर ग्लोबल टाइम्सच्याच माध्यमातून ‘भारताने 1962 मधील पराभव विसरु नये,’ असा इशारा चीनकडून देण्यात आला होता. त्यावर ‘भारत आता 1962 सारखा राहिलेला नाही,’असं उत्तर अरूण जेटली यांनी दिलं होतं. जेटलींना प्रत्युत्तर देताना ‘चीनदेखील 1962 सारखा राहिलेला नाही,’ असं म्हणत चीनमधील रणनितीतज्ज्ञ वांग देहूआ यांनी डिवचलं आहे.
यासोबतच ग्लोबल टाइम्समधून दोन्ही देशांनी चर्चेने वाद सोडवावा असं आवाहनही करण्यात आलं आहे. ""दोन देशांच्या भांडणामुळे तिस-या देशाचा फायदा होईल खासकरून अमेरिकेसारख्या देशाचा. दोन्ही देशांनी विकासावर लक्ष केंद्रीत करावे. भारत आणि चीनने वादांकडे लक्ष न देता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी,"" असं या लेखात म्हटलं आहे.