चिनी सैन्याच्या माघारीला लडाखमधून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 02:10 AM2021-02-11T02:10:19+5:302021-02-11T02:10:43+5:30
भारताने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.
बीजिंग : गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेला भारत-चीन यांच्यातील लष्करी तणाव निवळायला सुरुवात झाली आहे. लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरातून उभय देशांच्या सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयातर्फे बुधवारी सांगण्यात आले. मात्र, भारताने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.
गेल्या वर्षी मे महिन्यात लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या पँगाँग सरोवरानजीक भारत आणि चीन यांच्यात लष्करी तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून उभय देशात लष्करी पातळीवरील चर्चेच्या विविध फेऱ्या झाल्या.
२४ जानेवारी रोजी कॉर्प्स कमांडर पातळीवरील अधिकाऱ्यांत चर्चेची नववी फेरी झाली होती. त्यात उभय देशांनी पँगाँग सरोवर परिसरातून आपल्या सीमारेषेपर्यंत माघार घेण्याच्या मुद्द्यावर एकमत झाले. त्यातच मॉस्कोमध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यासंदर्भात चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी एक निवेदन जारी केले. तर, चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वु किआन यांनी त्यास दुजोरा दिला. भारताने मात्र यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. (वृत्तसंस्था)