चीनची आगळीक सुरूच; 30 दिवसांत 35 वेळा घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 08:46 AM2018-04-16T08:46:13+5:302018-04-16T08:48:09+5:30
संवेदनशील भागांमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चीनकडून वारंवार घुसखोरी केली जातं आहे. गेल्या महिन्याभरात चिनी सैन्यानं तब्बल 35 वेळा भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) या घुसखोरीला तीव्र विरोध केल्यामुळे चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली. एका बाजूला पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू असताना दुसऱ्या बाजूला चीननं घुसखोरी सुरू केल्यानं भारताची डोकेदुखी वाढली आहे.
एका हिंदी संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात चिनी सैन्यानं लडाखच्या उत्तर भागात सकाळी 7 वाजता घुसखोरी केली. चिनी सैनिक त्यांच्या वाहनातून जवळपास 14 किलोमीटर आत घुसले होते. त्यानंतर त्यांना इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी रोखलं. याशिवाय चिनी सैन्यानं लडाखच्या ट्रिग हाईट भागातदेखील अनेकदा घुसखोरी केली आहे. 18 मार्च, 21 मार्च, 24 मार्च आणि 30 मार्चला चिनी सैन्य भारतीय हद्दीत 8 किलोमीटरपर्यंत आलं होतं.
आयटीबीपीच्या अहवालानुसार, लडाखच्या ट्रॅक जंक्शन येथे सकाळी साडे आठ वाजता चिनी हेलिकॉप्टरनं घुसखोरी केली. चिनी हेलिकॉप्टर जवळपास 18 किलोमीटर भारतीय हद्दीत आलं होतं. याचाही आयटीबीपीनं विरोध केला. याबद्दलचा अहवाल आयटीबीपीकडून गृह मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. चिनी सैन्यानं 29 आणि 30 मार्चला अरुणाचल प्रदेशातील असफिला भागात 4 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याची माहिती या अहवालात आहे.
22 मार्चला अरुणाचल प्रदेशच्या डिचू भागात सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी चिनी सैनिक 250 मीटरपर्यंत भारतीय हद्दीत आले होते. यावेळी आयटीबीपी आणि चिनी सैन्यात जोरदार खडाजंगी झाली. यानंतर चिनी सैन्य मागे हटलं. भारत-चीन सीमेवरील अतिसंवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये चिनी सैन्याकडून वारंवार घुसखोरी केली जात आहे. भारतीय सैन्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत.