चीनने ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी रोखले; अरुणाचल प्रदेशात दुष्काळाचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 09:09 AM2018-10-19T09:09:56+5:302018-10-19T09:10:29+5:30
चीनने तिबेटमधून भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडविल्याचे समजते. यामुळे अरुणाचल प्रदेशातील काही भागात दुष्काळाचा मोठा सामना करावा लागत आहे.
नवी दिल्ली : भारतीय सीमेवर चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केल्याचे अनेकदा निदर्शानास आले आहे. आता चीनने तिबेटमधून भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडविल्याचे समजते. यामुळे अरुणाचल प्रदेशातील काही भागात दुष्काळाचा मोठा सामना करावा लागत आहे.
अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे खासदार निनोंग एरिंग यांनी केंद्रीय जलसंधारन राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी अडविल्यामुळे अरुणाचल प्रदेशातील तुतिंग, यिंगकियोंग आणि पासीघाट याठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे खासदार निनोंग एरिंग यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, या मुद्यावर अर्जुन राम मेघवाल यांच्यासह परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्हा प्रशासनाने येथील नदीच्या भागातील लोकांना अलर्ट जारी केला आहे. खासकरुन मच्छिमार व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. कारण, चीनने ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी सोडले तर पूरस्थिती निर्माण घेण्याची शक्यता आहे.